अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शिर्डी येथे सराफ व्यापारी विजयसिंह वसनाजी खिशी यांच्या ३.२६ कोटी रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणार्या सुरेशकुमार भुरसिंह राजपुरोहित (वय ३४, रा. चौहटन, बारमेर, राजस्थान) याला स्थानिक गुन्हे शाखेने गुजरातमधून अटक केली. त्याच्याकडून ३७ लाख १८ हजार ८७० रुपये किमतीचे ३९१.४६० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
१३ मे २०२५ रोजी विजयसिंह खिशी (वय ३५, रा. अमिरगढ, गुजरात) शिर्डीतील हॉटेल साई सुनिता येथे मुक्कामी होते. त्यांचा ड्रायव्हर सुरेशकुमार याने ३.२६ कोटींचे दागिने आणि रोख रक्कम चोरून पलायन केले. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १७ ऑगस्ट २०२५ रोजी सुरेशकुमारला तलोद, साबरकाठा, गुजरात येथून ताब्यात घेतले.
पोलीस कस्टडीत सखोल तपासानंतर २० ऑगस्ट २०२५ रोजी त्याच्या मूळ गावी चौहटन, बारमेर येथील शेतातील घरातून ३७.१८ लाखांचे दागिने जप्त केले. यापूर्वी २.५५ कोटींचे २७३८.६४६ ग्रॅम दागिने हस्तगत झाले होते. एकूण २.९२ कोटींचे ३१३०.१०६ ग्रॅम दागिने परत मिळाले. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, पो.नि. रणजित गलांडे, पोउपनि निवांत जाधव आणि इतरांनी ही कारवाई केली. पुढील तपास शिर्डी पोलीस करत आहेत