छत्रपती संभाजीनगर / नगर सह्याद्री –
सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ येथे रविवारी (१७ ऑगस्ट) घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. दोन मित्रांमधील दारू पिण्याच्या शर्यतीत एकाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्याची प्रकृती गंभीर झाली आहे. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
पिंपळगाव पेठ येथील मजुरी करणारे कैलास सांडू फुले (वय ३२) आणि कौतिक नारायण गुंजाळ (वय ३६) हे दोन मित्र रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुठाड फाट्यावरील एका अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाब्यावर भेटले. रविवार असल्याने कामाला सुट्टी होती, आणि दोघांनी मिळून दारू पिण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांच्यात पाणी न टाकता दोन-दोन क्वार्टर दारू कोण पिऊ शकतो, अशी शर्यत लागली.
दोघांनीही मग्यात प्रत्येकी दोन क्वार्टर दारू ओतली आणि एका दमात पिऊन टाकली. मात्र, अवघ्या काही वेळातच दोघांची प्रकृती बिघडली. स्थानिकांनी त्यांना तातडीने सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर कौतिक नारायण गुंजाळ याला मृत घोषित केले, तर कैलास सांडू फुले याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करून त्याला घरी पाठवण्यात आले.
या घटनेची सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. तसेच, ढाब्यावर अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती समोर आल्याने पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. ढाब्याच्या मालकावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.
कौतिकच्या मागे त्याची वयोवृद्ध पत्नी, दोन मुले, एक मुलगी, आई-वडील, दोन भाऊ, भावजय आणि एक बहीण असा मोठा परिवार आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला असून, गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.