अहिल्यानगर | नगर सह्याद्री
पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी महापालिकेकडून पावसाळ्याच्या तोंडावर नाले सफाईची मोहिम हाती घेतली जाते. परंतु, महापालिकेने राबविलेली मोहिम ही नालेसफाई की गवतसफाई आहे असा रोकडा सवाल माजी नगरसेवक निखील वारे यांनी उपस्थित केला आहे. महापालिकेच्या कामकाजावर आता नागरिकांकडून टीकेची झोंड उठली आहे.
पावसाळ्यापूव महापालिका प्रशासनाने नाले साफ सफाई करण्याचे मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी लाखोंचा खर्च केला जातो. मात्र प्रत्यक्षात ही कामे पाहतानाले सफाई होत आहे की केवळ गवतसफाई होत आहे? पाण्याला अडथळे ठरणारे अतिक्रमणे काढली जात नाहीत. जेसीबी मशीन जाते तेथीलच सफाई केली जाते. त्यामुळे संपूर्ण नालेसफाईचा उद्देशच साध्य होत नसल्याचा आरोप माजी नगरसेवक निखिल वारे यांनी केला.
माजी नगरसेवक निखिल वारे यांनी कार्यकर्त्यांसह सावेडी उपनगरातील सूर्यनगर परिसरातील कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी महापालिकेच्या मोहिमेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सध्या अवकाळी पाऊस सुरू असून येत्या पंधरा दिवसात पावसाळा सुरू होणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या वतीने अहिल्यानगर शहरातील विविध भागांमध्ये नालेसफाईचे काम सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात ही कामे थातूरमातून केली जात आहे. नालेसफाईच्या नावाखाली गवत काढले जात आहे. महापालिकेची लाखो रुपयांची योजना फसत असून नागरिक नाराजी व्यक्त आहेत.
फोटोसेशन नको कार्यवाही व्हावी
दरवष महापालिका नालेसफाई करते परंतु तरीही पावसाचे पाणी अडले जाते. महापालिकेने नुसती फोटोसेशन पुरती कारवाई न करता नालेसफाईची योग्य कार्यवाही व्हावी अशी मागणी निखील वारे यांनी केली आहे. यावर आता महापालिका प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पाण्याला अडथळे ठरणारी अतिक्रमणे काढावीत: निखील वारे
ज्या ठिकाणी पाण्याचा योग्य निचरा होत नाही. तसेच पाण्याला अडथळा ठरणारे अतिक्रमणे आहेत. ती काढणे गरजेचे आहे. त्याठिकाणी प्रत्यक्ष व ठोस कारवाई केली पाहिजे. केवळ गवतसफाई न करता पावसाचे पाणी योग्य पद्धती कसे निघून जाईल हे पाहिले पाहिजे. नालेसफाई योग्य पद्धतीने न झाल्यास तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशाराही माजी नगरसेवक निखिल वारे यांनी दिला.