पारनेर । नगर सहयाद्री:-
पारनेर तालुक्यातील पठारवाडी परिसरात पुन्हा एकदा कृषी पंप चोरणाऱ्या टोळीने उच्छाद मांडला असून, दिनांक १३ रोजी रात्री दोनच्या सुमारास कुकडी कालव्यालगत लावलेल्या कृषी पंप मोटारी फोडून त्यातील तांब्याच्या तारा व केबल्स चोरून नेण्यात आल्या. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात संतापाचे वातावरण असून टोळीचा बंदोबस्त करून या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष पथक स्थापन करावे, अशी मागणी होत आहे.
शेतकरी सुनील सुपेकर, सुनील पठारे, शंकर ढवळे, निलेश पठारे आदींनी कुकडी कालव्यावर बसवलेल्या सात कृषी पंप मोटारींची तोडफोड करून चोरट्यांनी तांब्याचे तारा आणि केबल्स लंपास केल्या. पठारवाडी, निघोज, जवळा, गाडीलगाव, गुणोरे, सांगवी सूर्या, राळेगण थेरपाळ, कोहोकडी, म्हसे या परिसरात गेल्या दोन वर्षांपासून कृषी पंप व केबल चोरीच्या घटनांत सातत्याने वाढ होत आहे. पोलिसांना या टोळीचा माग काढण्यात अद्याप यश आलेले नाही, यामुळे चोरट्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढत आहे.
या प्रकारांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असून, सध्याच्या काळात कांदा लागवड व सोयाबीनसह इतर पिकांसाठी पाण्याची आवश्यकता भासत असताना असे प्रकार घडत असल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. या प्रकारांची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.