वनस्पती संरक्षण विज्ञानातील अतुलनीय योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल
पारनेर । नगर सहयाद्री:-
राष्ट्रीय कृषी विज्ञान अकादमीकडून वनस्पती संरक्षण विज्ञानातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. शिवाजी हौसराव ठुबे यांची प्रतिष्ठेच्या युवा शास्त्रज्ञ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. देशातील सर्वोत्तम युवा शास्त्रज्ञांना दरवष हा पुरस्कार प्रदान केला जातो. डॉ. ठुबे यांच्या रूपाने नागपूर कापूस संशोधन केंद्राच्या स्थापनेपासून प्रथमच एका शास्त्रज्ञाला हा बहुमान मिळाला आहे. डॉ. ठुबे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
मूळचे पारनेर तालुक्यातील बाबुड येथील शेतकरी कुटुंबातील असलेल्या डॉ. ठुबे यांचा शैक्षणिक प्रवास अत्यंत खडतर परिस्थितीतून झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबुड येथे, तर माध्यमिक शिक्षण श्री ज्ञानेश्वर विद्यालय रुई छत्रपती येथे झाले. चंद्रपूर येथील आनंद निकेतन वरोरा येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कीटक शास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. कीटक शास्त्रातील एम.एस.सी. प्रवेश परीक्षेत भारतातून तिसरा क्रमांक. पीएच.डी. (कीटक शास्त्र) दिल्ली येथून पूर्ण करताना देशातून प्रथम क्रमांक पटकावला. संशोधन कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल.
पीएच.डी. फेलोशिप मिळाल्यानंतर त्यांनी केरळ येथील सुपारी संशोधन केंद्रात शास्त्रज्ञ म्हणून आपल्या कारकिदची सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांची नागपूर येथील कापूस संशोधन केंद्रामध्ये बदली झाली. कीटक शास्त्रातील आपल्या ज्ञानाचा उपयोग करून त्यांनी वनस्पती संरक्षण विज्ञानात नेहमीच उल्लेखनीय संशोधन केले आहे. त्यांच्या या संशोधनाचा फायदा वन संरक्षण, पीक संरक्षण आणि दुर्मिळ वनस्पती संरक्षण अशा विविध क्षेत्रांना झाला आहे. या अतुलनीय योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना हा प्रतिष्ठेचा युवा शास्त्रज्ञ पुरस्कार जाहीर केला आहे.
राष्ट्रीय कृषी विज्ञान अकादमीचे अध्यक्ष डॉ. हिमांशू पाठक यांनी पत्राद्वारे कळविल्याप्रमाणे, सदर पुरस्कार वितरण सोहळा 5 जून 2026 रोजी नवी दिल्ली येथे पार पडणार आहे. या समारंभासाठी देशातील सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत.
यशात कुटुंबीयांचा व गुरूजनांचा मोठा वाटा
युवा शास्त्रज्ञ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डॉ. शिवाजी ठुबे म्हणाले की या यशात कुटुंबीयांचा व गुरुजनांचा मोठा वाटा असल्याचे सांगत डॉ. ठुबे यांनी आपल्या यशाचे श्रेय वडील हौसराव ठुबे, आई मंगल ठुबे, बंधू डॉ. दादाभाऊ व सेवानिवृत्त सैनिक विजय ठुबे यांच्यासह शिक्षक वृंद, ग्रामस्थ आणि सहकारी मित्रांना दिले आहे.



