डॉ. बोरगेंच्या अडचणी कायम ; साडेसोळा लाखांच्या अपहार प्रकरणी अधिक तपासाचे आदेश
९ फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
महापालिकेच्या आरोग्य विभागातील साडेसोळा लाखांच्या गाजलेल्या अपहार प्रकरणी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांचे नाव वगळण्याचा कोतवाली पोलिसांचा अहवाल फिर्यादीच्या आक्षेपानंतर न्यायालयाने अमान्य केला आहे. या गुन्ह्यात अपूर्ण व सदोष तपास झाल्याचा फिर्यादी डॉ. सतीश राजूरकर यांचा आक्षेप मान्य करत, जिल्हा न्यायालयाने ९ फेब्रुवारी २०२६ पूर्वी अधिक तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश कोतवाली पोलिसांना दिले आहेत.
आरोग्य विभागातील या अपहार प्रकरणी राष्ट्रीय आरोग्य अभियानचे शहर लेखा व्यवस्थापक विजयकुमार महादेव रणदिवे व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, कोतवाली पोलिसांनी तपासात डॉ. बोरगे यांचा सहभाग आढळला नाही व त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्याइतपत पुरावा नाही, असा अहवाल न्यायालयात सादर केला होता.
या अहवालावर फिर्यादी डॉ. राजूरकर यांनी ॲड. अभिजीत पुप्पाल यांच्यामार्फत आक्षेप घेत अधिक तपासाची मागणी केली. “डिजिटल की”, कॅश बुक, आवश्यक रजिस्टर व गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे तपासात घेण्यात आलेली नाहीत, त्यामुळे तपास अपूर्ण व चुकीचा झाला आहे,” असा प्रबळ युक्तिवाद ॲड. पुप्पाल यांनी केला.
डॉ. बोरगे यांच्या वतीने या अर्जाला विरोध करण्यात आला. तथापि, न्यायालयाने फिर्यादीचा अर्ज मंजूर करून घेत, पोलिसांना अधिक तपास करण्याचे व ९ फेब्रुवारी २०२६ पूर्वी अहवाल सादर करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.



