मुंबई । नगर सहयाद्री:-
भिवंडी तालुक्यातील खार्डी येथे सोमवारी रात्री उशिरा घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने ठाणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी यांची त्यांच्या कार्यालयातच धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. तर धीरज तांगडी गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही थरारक घटना सोमवारी रात्री सुमारे ११ वाजता घडली. प्रफुल्ल तांगडी हे त्यांच्या J.D.T. इंटरप्रायझेस या कार्यालयात दोघा सहकाऱ्यांसह बसलेले असताना चार ते पाच हल्लेखोरांनी अचानक प्रवेश करून धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या भीषण हल्ल्यात प्रफुल्ल व तेजस तांगडी यांचा जागीच मृत्यू झाला, तर धीरज तांगडी गंभीर जखमी झाला.
पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले, तर जखमी धीरज तांगडी याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून त्याचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून त्यांनी घटनेचा तीव्र निषेध केला आहे. ठाणे जिल्हा भाजपने पोलिसांकडे तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे.
पोलिसांनी खार्डी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी विशेष तपास पथक नेमण्यात आले आहे. गेल्या वर्षीही प्रफुल्ल तांगडी यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.भिवंडी परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नागरिकांनी संयम बाळगावा, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.