श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
दसऱ्याच्या आणि नवरात्रीच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर फुलांना अपेक्षित बाजारभाव मिळेल, या आशेने फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी मेहनत घेतली. मात्र, सध्या झेंडू, गुलाब, शेवंती, गुलछडी यांसारख्या फुलांच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक फटका बसत आहे.
फुलांचे उत्पादन करताना खत, बियाणे, औषध फवारणी व मजुरीसाठी मोठा खर्च येतो. मात्र सध्या झेंडूला बाजारात भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांना आपली फुले शेतातच वाया घालावी लागत आहेत. काहीजणांनी तर फुलांचे तोडलेले गठ्ठे रस्त्यालगत टाकल्याचे दृश्य श्रीगोंदा मांडवगण रस्त्यावर दिसून आले.
फुले झाडावरच राहिली असती तर झाड खराब झाले असते, म्हणून तोडूनही फेकावी लागली, अशी खंत शेतकरी व्यक्त करत आहेत. त्यामुळे एकीकडे उत्पादन खर्च, आणि दुसरीकडे विक्री न झाल्याने होणारे नुकसान यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे.
सध्याच्या बाजारात झेंडूला प्रती किलो अवघे ५ ते ८ रुपये दर मिळतो आहे, तर काही ठिकाणी खरेदीदारच मिळत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर काढणी केलेली फुले सडून जात आहेत. यातून ना नफा, ना उत्पादनाचा खर्च परत मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे.
शेतकऱ्यांचे आता लक्ष दिवाळीसारख्या आगामी सणांकडे आहे. त्यावेळी फुलांना चांगला दर मिळेल, अशी आशा ते व्यक्त करत आहेत. हमीभाव मिळाला नाही, तर फुलशेती करणारे शेतकरी मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता आहे.