कोल्हापूर | नगर सह्याद्री
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भावकी काढून काका अजित पवार यांना डिवचल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भावकीमुळे तू आमदार झालास म्हणत पलटवार केला.
रोहित पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (१६ ऑगस्ट) इस्लामपूरमधील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन.डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील (माई) मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्रा. डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळ्यासाठी एकत्र आले होते. यावेळी चांगलीच राजकीय जुगलबंदी रंगली. रोहित पवार यांनी अजित पवारांवर फटकेबाजी केल्यानंतर जयंत पाटील यांनी वाळवा तालुका सहजासहजी वाकत नाही म्हणत अजितदादांना अप्रत्यक्ष चिमटे काढले. त्यामुळे चांगलीच शाब्दिक फटकेबाजी रंगली.
रोहित पवार यांनी व्यासपीठावरून पहिल्यांदा बोलताना दादा गावकीचा विचार करतात. मात्र, भावकीला विसरले असा सणसणीत टोला लगावला होता. रोहित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये चांगलीच फटकेबाजी केली. यानंतर अजित पवार व्यासपीठावर बोलायला उभे राहिल्यानंतर अजित पवार यांनी सुद्धा रोहित पवारांच्या भावकीचा संदर्भ घेत चांगलाच पलटवार केला आणि माझ्या नादाला लागू नका, असा हसत हसत इशारा दिला.
आपण बॅलेट पेपरवर निवडून आला आहे, जयंत पाटील जरा त्यांना सांगा असे म्हणत रोहित पवार यांच्या वक्तव्याचा चांगला समाचार केला. ते म्हणाले की मी महायुतीमध्ये गेल्यापासून तुमच्या कुणावर टीका केली आहे का? तुमच्या तुम्ही तुमच्या विचाराने चालत आहात. मी माझ्या विचाराने चाललो असल्याचे सांगत अजित पवार यांनी माझ्या नादाला लागू नका असा इशारा दिला.