अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
शहरात महानगरपालिका अतिक्रमण मोहीम राबवत असून, रस्त्याच्या कडेला फळविक्री करणारे, हातगाडीवाले, चहावाले यांसारख्या गरीब लोकांना लक्ष्य केले जात आहे. या मोहिमेमुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. हे विक्रेते कोणतेही कायमस्वरूपी बांधकाम न करता फक्त रस्त्याच्या कडेला बसून आपल्या कुटुंबासाठी रोजीरोटी मिळवत आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे प्रत्येकाला व्यवसायासाठी स्वतंत्र जागा मिळणे शक्य नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.
खासदार निलेश लंके यांनी या रस्त्यावरील फळविक्रेत्यांची भेट घेतली आणि त्यांच्या परिस्थितीबद्दल संवेदनशीलता व्यक्त केली. त्यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांशी संवाद साधत गरीब लोकांना त्रास देणे तात्काळ थांबवावे, असा आदेश दिला. हे मेहनती गरीब लोक दिवसरात्र कष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. त्यांना हटवून त्यांच्या पोटावर पाय देणे अमानवी आहे. नो-हॉकर्स झोनमध्ये नियम लागू करा, पण ज्यांच्याकडे कोणतेही कायमस्वरूपी बांधकाम नाही त्यांना लक्ष्य करू नका, असे त्यांनी सांगितले.
खासदार लंके यांनी स्पष्ट शब्दांत महानगरपालिका अधिकाऱ्यांना सांगितले की, गरीबांना हटवून त्यांची उपजीविका काढून घेणे हा भेदभाव आहे. जर गरीबांवरच कारवाई केली जाणार असेल, तर त्यांच्या कुटुंबांचे पालनपोषण कसे होणार? महानगरपालिका आयुक्त त्यांना अन्न पुरवणार नाहीत. त्यामुळे या गरीब विक्रेत्यांना त्यांच्या हक्काचे काम करण्याची परवानगी द्या. खासदार निलेश लंके यांच्या या हस्तक्षेपामुळे गरीब विक्रेत्यांना आधार मिळाला आहे. त्यांच्या संघर्षाला एक दिशा मिळाली असून प्रशासनाने आता संवेदनशील होऊन योग्य ती भूमिका घ्यावी, अशी मागणी होत आहे.