अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात येणारे रँकिंग घसरल्याचा ठपका ठेवत मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कारवाई केली. या कारवाईमुळे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना अस्वस्थता निर्माण झाली आहे.
आरोग्य विभागात विविध केंद्रांवर कर्तव्य बजावणाऱ्या सुमारे 80 कर्मचाऱ्यांनी सोमवारी मनपा आयुक्त डांगे यांना निवेदन देऊन रँकिंगच्या कारणावरून कुठल्याही कर्मचाऱ्यावर कारवाई करू नये अशी मागणी केली. रँकिंगबाबत चुकीच्या पद्धतीने माहिती प्रसारित होत असल्याने पूर्ण कार्यक्षमतेने काम करूनही आमच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे अयोग्य असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मागील वर्षभरात आरोग्य कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागाच्या नियमित कामांबरोबरच महापालिका प्रशासनाकडून अतिरिक्त कामे सोपविण्यात आली. आशा सेविकांनाही ही अतिरिक्त कामे करावी लागली. यात 12 आठवडे आयुक्तांच्या संकल्पनेतून डेंग्युमुक्त अभियान राबविण्यात आले.
शासनाची वयोश्री योजना, लाडकी बहीण योजना, लोकसभा निवडणुकीकरिता आवश्यक आरोग्य विषयक कामकाज, विधानसभा निवडणुकीवेळी आवश्यक आरोग्य विषयक कामकाज, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यावेळी दिलेली जबाबदारी अशा अनेक कामांमुळे आरोग्य कार्यक्रमांचे निर्देशांक पूर्ण करण्याकरिता पुरेसा वेळच मिळाला नाही. दरम्यानच्या कालावधीमध्ये आरोग्य विभागाचे पोर्टल सुद्धा व्यवस्थित चालत नव्हते. त्यामुळे आम्ही केलेल्या कामकाजाची संबंधित पोर्टलवर नोंद घेण्यास अडचणी येत होत्या. तथापि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी वेळोवेळी बैठका घेऊन, मार्गदर्शन करून आमचे कामकाज पूर्ण करून घेतले आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या रँकिंगमध्ये मार्गदर्शक सूचनांनुसार सद्यस्थितीत सुधारणाही दिसून येत आहे.
अतिरिक्त कामकाजामुळे महापालिकेच्या रँकिंगवर परिणाम झाल्याची वस्तुस्थिती आहे. आम्ही सर्व कर्मचारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली व नियंत्रणाखाली आरोग्य विभागाचे कामकाज अवरित पाहत आहोत. प्रस्तुत प्रकरणी आरोग्य विभागाच्या कोणत्याही कर्मचाऱ्यावर रँकिंगचा ठपका ठेवून कारवाई करू नये. तसेच आपल्यामार्फत विविध माध्यमांना योग्य खुलासा आल्यास अहिल्यानगर महापालिकेची जनमानसातील प्रतिमा उजळण्यास नक्कीच मदत होईल. आमच्या वस्तुस्थितीदर्शक पत्राचा विचार करून रँकिंग करिता कोणालाही जबाबदार न धरता सदर प्रकरण बंद करावे असे निवेदनात म्हटले आहे.