अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
घरगुती वापरासाठी असलेल्या गॅस सिलेंडरचा साठा करून त्यातील गॅस व्यवसायिक टाक्यांमध्ये रिफीलिंग करून बेकायदेशीर विक्री करणाऱ्या तीन इसमांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईत तब्बल ३३ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
दिनांक २९ ऑक्टोबर रोजी पोनि. किरणकुमार कबाडी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, प्रविण नारायण खडके (रा. चिचोंडी पाटील, ता. जि. अहिल्यानगर) हा आपल्या साथीदारांसह घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध साठा करून त्याचे व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये रिफीलिंग करत आहे.
त्यावरून कबाडी यांनी पोउपनि. अनंत सालुगडे व त्यांच्या पथकास कारवाईचे आदेश दिले. पथकाने चिचोंडी पाटील येथे धाड टाकली असता, ठिकाणी तीन इसम गॅस टाक्यांमध्ये गॅस भरताना दिसून आले.
तीन इसमांना अटक
प्रविण नारायण खडके (वय २८, रा. चिचोंडी पाटील), वैभव आंबादास पवार (वय ४७, रा. सांडवा), गणेश पद्माकर भोसले (वय ३७, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा).
या तिघांकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी आर्थिक फायद्यासाठी घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक व वाहनांमध्ये गॅस भरल्याची कबुली दिली.
३३ लाखांचा मोठा मुद्देमाल जप्त
चार वाहने – ₹२५,१०,०००/-, एचपी व भारत गॅस कंपनीच्या २६४ भरलेल्या व रिकाम्या टाक्या – ₹८,३१,७००/-, गॅस भरण्याचे मशीन – ₹१०,०००/-,
इलेक्ट्रॉनिक वजनकाटा – ₹५,०००/-, एकूण किंमत : ₹३३,६५,५००/.
कारवाईत सहभागी पथक
या कारवाईत पोउपनि. अनंत सालुगडे, अंमलदार लक्ष्मण खोकले, गणेश लबडे, ह्रदय घोडके, बिरप्पा करमल, शामसुंदर जाधव, भिमराज खर्से, मनोज साखरे, महादेव भांड व उमाकांत गावडे यांनी सहभाग घेतला.



