पिंपरी जलसेन | नगर सह्याद्री
पारनेर तालुयातील पिंपरी जलसेन येथील शेतकर्यांना शेतीपंप व घरगुती वीज कमी दाबाने येत असल्याच्या तक्रारी नंतर शासनाने निधी देऊन ०२ घरगुती विजेसाठी व ०१ शेतीपंपाच्या विजेसाठी रोहित्र मंजूर केले. गेल्या ०६ महिन्यांपूर्वी ठेकेदाराने रोहित्र उभे केले. परंतु अद्याप जोडले नसल्याने नागरिकांची अद्याप विजेची अडचण सुटली नसल्याने आम्हाला कोणी लाईट देता का लाईट अशी म्हणायची वेळ पिंपरी जलसेन मधील नागरिकांवर आली आहे.
याबाबत सविस्तर असे की, पिंपरी जलसेन येथे अडसरे मळा, काळे मळा येथे घरगुती विजेसाठी तर थोरात दरा येथे शेती पंपाच्या विजेसाठी शासनाकडून निधी मंजूर झाला होता. प्रत्यक्षात रोहित्र उभे करण्याचे काम देखील ठेकेदाराने पूर्ण केले. परंतु त्यापुढे त्या रोहीत्राला विजीचे कनेशन देऊन पुढील विजेचा भार जोडून इतर रोहित्राचे लोड कमी करून सर्व रोहित्राला पुरेसा लोड देणे काम अद्याप केले नसल्याने अजूनही नागरिकांना कमी दाबाने वीज मिळत आहे. याबाबत शासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. शासनाचा निधी आला तो खर्चही झाला परंतु उर्वरित काम बाकी असल्याने नागरिकांना या निधीचा लाभ अद्याप मिळाला नसल्याने शासनाच्या निधीचा उपयोग ठेकदाराला झाला की नागरिकांना ..? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
याबाबत शासन स्तरावर योग्य ती कार्यवाही करून तातडीने हे रोहित्र जोडून देण्यात यावीत. व त्यावरील भार वितरीत करून नागरिकांच्या घरगुती व शेती पंपाच्या विजेचा प्रश्न सोडवण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
शेतीपंपासाठी वेगळ्या फिडरची मागणी
पिंपरी जलसेन, चिंचोली, गडदवाडी, गांजिभोयारे या गावांसाठी वडझिरे सबस्टेशन वरून वीज पुरवठा होत आहे. परंतु या गावांना देण्यात येणार्या विजेवर वडझिर परिसरातील सर्व शेतीपंपाचा लोड असल्याने या गावांना वीज पूर्ण दाबाने मिळत नाही. त्यामुळे पिंपरी जलसेन, चिंचोली, गडदवाडी, गांजिभोयारे या गावांसाठी वडझिरे सबस्टेशन वरून वेगळ्या फिडर वरून वीज पुरवठा झाल्यास या गावांची वीज प्रश्न सुटणार आहे. याबाबत नागरिक लवकरच निवेदन देणार आहेत.
घरगुती बल्ब लागेना
घरगुती वीज देखील कमी दाबाने असल्याने संध्याकाळी घरातील बल्ब देखील लागत नसल्याने नागरिकांना मेणबत्ती च्या उजेडात रात्री काढाव्या लागत आहेत. जनावरांसाठी चारा कुट्टी करणारे यंत्र, घरातील पिठाच्या गिरणी देखील अपुर्या विजेअभावी चालत नसल्याने नागरिक अनेक वर्षांपासून त्रस्त आहेत. यावर वेळीच उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.