अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात बनावट कागदपत्रे, खोटे मालक उभे करून आणि बनावट सह्यांच्या आधारे सावेडी येथील एका नामांकित डॉक्टरची तब्बल १४ कोटी ६६ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ३० जणांच्या टोळीविरोधात कटकारस्थान रचून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेंबर २०१७ ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत निबळक गावच्या शिवारात घडला आहे.
याबाबत डॉ. अनिल सुर्यभान आठरे पाटील (वय ७३, रा. झोपडी कॅन्टीन समोर, आठरे पाटील हॉस्पीटल, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी स्वप्नील रोहीदास शिंदे, अमोल बबन जाधव आणि त्यांच्या इतर साथीदारांनी संगनमत करून हा कट रचला.
आरोपींनी डॉ. आठरे पाटील यांच्या जमीन खरेदी-विक्रीच्या वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये सुरुवातीला त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपींनी बनावट कागदपत्रे, बनावट मिळकती दाखवल्या. इतकेच नाही, तर बनावट मालक व खोटे लोक उभे करून, त्यांच्या बनावट सह्या करून फिर्यादीला दस्त हस्तांतरित केले. या खोट्या कागदपत्रांच्या आधारे आरोपींनी डॉ. आठरे पाटील यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले.
या ३० जणांविरोधात गुन्हा दाखल
डॉ. आठरे पाटील यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी १) स्वप्नील रोहीदास शिंदे, २) अमोल बबन जाधव, ३) भाऊसाहेब नवृत्ती नागदे, ४) चंद्रशेखर हरिभऊ शिंदे, ५) सिराज (पूर्ण नाव माहित नाही), ६) दत्तु सस्ते, ७) श्रीकांत आल्हाट, ८) रॉकी सुदाम कांबळे, ९) सुनिल बाळु देसाई, १०) अनिल बाळु देसाई, ११) सुमन बाळु देसाई, १२) ज्योती राजु कांबळे, १३) प्रशांत प्रभाकर गायकवाड, १४) महेश नारायण कु-हे, १५) अरुण गोवींद खरात, १६) गणेश तकडे, १७) गणेश रविंद्र साबळे, १८) लखण बबन भोसले, १९) विजय नाथा वैरागर, २०) भारत यल्लप्पा फुलमाळी, २१) रामा गंगाधर पवार, २२) प्रेमचंद होनचंद कांबळे, २३) वैशाली स्वामी, २४) मिनल स्वामी, २५) सुनिल नाथा वैरागर, २६) संतोष नामदेव कदम, २७) साजीद रहेमुद्दीन शेख, २८) संजय बाजीराव आल्हाट, २९) सचिन रोहीदास शिंदे आणि ३०) इतर अनोळखी साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी हे करत आहेत.



