श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
तालुक्यातील ढोकराई येथे नागपंचमीच्या निमित्ताने पारंपरिक पतंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यंदा परशुराम निंबाळकर यांनी तब्बल आठ फूट उंचीची पतंग बनवून उत्सवात आकर्षणाचा केंद्रबिंदू बनवले. ढोकराईकरांच्या पतंगाचं वेड जुनं असून या सणानिमित्त आयोजित पतंगोत्सवाची अनेक वर्षांपासून परंपरा आहे.
या उत्सवात लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच पतंग उडवण्याचा आनंद लुटला. श्रीगोंदा तालुक्यातील ढोकराई गावात विविध रंगांचे पतंग आकाशात झळकत होते. गावातील मुलांनी स्वतः पतंग बनवून त्यांच्या हाताने उडवून आनंद घेतला. ढोकराईतील नागरिकांनी पतंग उडवण्याची कला आत्मसात केली आहे. लहानमुले, मित्रमंडळी नागपंचमीच्या निमित्ताने एकत्र येऊन पतंगबाजीचा आनंद घेतात.
पंचमीच्या दिवशी गावातील प्रत्येक घराच्या आंगणात पतंग उडवण्याचे दृश्य दिसत होते. तहानभूक विसरून मुलांनी आकाशात रंगीबेरंगी पतंग उडवण्याचा आनंद घेतला. गेल्या काही वर्षांत पतंग उडवण्याचा खेळ कमी झाल्याचे दिसत आहे. पूर्वी मुलं मोकळ्या जागेत जाऊन तासंतास पतंग उडवत असत. मात्र, श्रीगोंदा तालुक्यात आता हे प्रमाण कमी झाल्याचे जाणवते.
अशा परिस्थितीत, ढोकराईत साजरा झालेला पतंगोत्सव हा लोकांमध्ये नवीन उत्साहाचे संचारक ठरला आहे. गोरगरीब कुटुंबातील मुलांनीही या सणाचा आनंद घेतला आणि यापुढेही हा उत्सव याच उत्साहात साजरा होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.