कल्याणीनगर अपघात प्रकरण : देवेंद्रजी आणि पुणेकर पोलिसांनो, शाब्बास! बापासह सार्यांनाच जेलची हवा!
पुणे | नगर सह्याद्री
कल्याणीनगर परिसरातील अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला जामिन मिळाल्यानंतर संतापाची लाट संपूर्ण राज्यात उसळली. ‘बापालाच बेड्या ठोका; मोठ्या घरच्या दिवट्यांना आवरा!’, या मथळ्याखाली सारिपाट’ मांडला गेला. संपूर्ण महाराष्ट्रातील समाजमाध्यमे आणि मिडियातून हे प्रकरण उचलून धरण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाची दखल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने घेतली. यानंतर पुणे पोलिसांची तपासाची गती वाढली आणि या दिवट्या पोराचा बाप म्हणजेच विशाल अग्रवाल याला थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन बेड्या ठोकण्यात आल्या.
अग्रवाल याला पळून जाण्यात मदत करणारा त्याचा वाहन चालक, मदतनीस यांनाही बेड्या ठोकण्यात आल्या. याशिवाय मद्य देणारा हॉटेल मालक, व्यवस्थापक, बार काऊंटर सांभाळणारा अशा सर्वांनाच बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. देवेंद्रजी आणि त्यांच्या गृह विभागाच्या या कारवाईचे पुणेकरांसह राज्यातील जनतेने स्वागत केले आहे. देवेंद्र फडणवीसांच्या कारवाईच्या आदेशानंतर पुणे पोलिसांनी कारवाईचा सपाटा लावला असून २४ तासात या प्रकरणी सात जणांना अटक केली आहे.
कल्याणीनगर परिसरात भरधाव वेगात गाडी चालवून दोघांचा जीव घेणार्या अल्पवयीन मुलांला १५ तासात जामीन मिळाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी चुकीचा तपास केला, पैशांची सेटलमेंट केली असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला त्यानंतर हे प्रकरण चांगले तापले. आता याच मुद्द्यावरून पोलिसांनी कारवाई करत संपूर्ण देशाच्या नजरा वळवल्या आहेत. काल देवेंद्र फडणवीस यांच्या कारवाईच्या आदेशानंतर पुणे पोलिसांनी २४ तासात या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.
पुण्यात भरधाव वेगात गाडी चालवून दोघांचा जीव घेणार्या मुलाचे वडील आणि बांधकाम व्यायवसायिक विशाल अग्रवाल हा घटना घडल्यानंतरच्या रात्रीपासून पसार झाला होता. त्याला पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली. जी.एम प्लाझा लॉजिंग अँड रेस्टॉरंटमधून पुण्याचे उद्योजक विशाल अग्रवाल याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. विशाल अग्रवालसह त्याचा ड्रायव्हर आणि अन्य एक व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या ड्रायव्हरचं नाव चत्रभूज डोळस असून त्याच्यासोबत राकेश पौडवाललाही अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलाला मद्य देणारा हॉटेल काझीचा मालक प्रल्हाद भुतडा आणि मॅनेजर सचिन काटकर त्याचबरोबर हॉटेल ब्लॅकचा संदीप सांगळे आणि बार काऊंटर जयेश बोनकर याला देखील अटक करण्यात आली आहे.
दिवटा बेवडा; त्याला दारुची परवानगी! विशाल अग्रवालवर दोन गुन्हे दाखल
विशाल अग्रवाल हा पुण्यातील ब्रह्मा कॉर्प या बांधकाम उद्योग समुहाचा प्रमुख आहे. मुलगा अल्पवयीन असूनही त्याला कार चालवायला दिल्याबद्दल विशाल अग्रवाल याच्यावर मोटर वाहन अधिनियमाच्या कलम ३, ५ आणि १९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याचबरोबर आपला अल्पवयीन मुलगा दारू पितो हे माहित असूनही त्याला पार्टी करण्यास परवानगी दिल्याबद्दलही त्याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र हा गुन्हा दाखल झाल्यानंतर विशाल अग्रवाल हा नॉट रीचेबल झाला होता. अखेर त्याला पुणे पोलिसांनी संभाजीनगरमधून अटक केली.
अल्कोहोल चाचणीचा अहवाल निगेटीव्ह देणार्या डॉक्टरांसह पोलिस यांना आरोपी करणार का?
कल्याणी नगर परिसरातील या अपघातातील आरोपीची अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल आरोग्य यंत्रणेने दिला. त्यानुसार पोलिसांकडे त्याची नोंद झाली असल्याचे समोर आले आहे. अल्पवयीन असलेला आरोपी दारूत पित असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यानुसार हॉटेल मालक, त्याचा व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे या दिवट्याची अल्कोहोल चाचणी निगेटीव्ह देणार्या आरोग्य विभागातील डॉक्टरांसह पोलिस संशयाच्या फेर्यात आले आहेत. त्यामुळे पुणे अपघात प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.