अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
रुग्णालयात रोज निर्माण होणाऱ्या बायोमेडिकल वेस्टची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. मात्र, या नियमालाच शहरातील काही रुग्णालये केराची टोपली दाखवत असून उघड्यावर सर्रास जैविक कचरा फेकला जात आहे. बायोमेडिकल कचरा रस्त्यावर टाकणे चांगलेच भोवले आहे. श्रीराम चौकातील खाजगी रुग्णालयास पाच हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
रस्त्यावर कचरा टाकल्याने संसर्गाचा धोका निर्माण होत आहे. दवाखान्यात वापरण्यात आलेल्या सिरिंज, बाटल्या, इंजेक्शन, ट्यूब, सलाइन, पाइप यासह अन्य कचरा उघड्यावरच टाकला जातो. यामधील काही साधनांचा खेळण्यासाठी वापर करीत असतात. यातून अनेक अपायकारक घटना घडू शकतात.
शहरातील रुग्णालयातून बायोमेडिकल वेस्ट चा कचरा दररोज मोठ्या प्रमाणात निघत असून घातक असा हा कचरा काही रुग्णालयाकडून उघड्यावर टाकला जात आहे. वास्तविक महापालिकेने बायोमेडिकल वेस्टसाठी खासगी ठेका दिला आहे असे असतानाही येथील एका रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. सदर बाब येथील सामाजिक कार्यकर्ते महावीर पोखरणा यांनी महापालिकेचे सावेडी चे स्वच्छता निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी सदर रुग्णालयास पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली.