सुनिल चोभे | नगर सह्याद्री:-
नगर तालुक्यात बदलत्या हवामानामुळे फळ पिकांसह रब्बी हंगामातील सर्वच पिकांवर विविध रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली आहे. कीटकनाशक, बुरशीनाशक औषध फवारणीबरोबरच काही ठिकाणी देशी जुगाड करून शेतकरी पिके वाचविण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे रब्बी हंगामातील सर्वच पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे सर्वच पिके रोगांना बळी पडले आहेत
सततच्या बदलत्या हवामानामुळे गहू, हरभरा, ज्वारी, गावरान कांदा, लसूण, चारा पिके, मका, तसेच भाजीपाल्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. कांद्यावर रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सुमारे पन्नास हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामातील पिके आहेत. बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यांतील ढगाळ हवामान, धुके यामुळे लाल कांदा विविध रोगांनी ग्रासला गेला होता. त्यामुळे लाल कांद्याच्या उत्पादनात निम्म्याने घट झाली.
दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने नगर तालुक्यात काही ठिकाणी लाल कांद्याचा चिखल झाला. रब्बी पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांकडून बुरशीनाशक, कीटकनाशक फवारणी करण्यात येत आहे. रब्बी पिके घेण्यासाठी शेतीची मशागत, खुरपणी, बियाणे, खते, लागवड यावर मोठा शेतकऱ्यांनी खर्च केला आहे. सर्वच पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धडपड सुरु असल्याचे दिसून येते.
फळांची वाढ होईना
सतत हवामानात बदल होत असल्याने फळपिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. फळांवर काळा मावा, पाने पिवळी पडणे असे प्रकार दिसून येत आहेत. तसेच फळांची वाढ होत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. फळांची वाढ होण्यासाठी शेतकरी कृषी सेवा केंद्र चालकांकडून सल्ला घेत औषधांची फवारणी करत आहेत.
कांद्याचे भाव कोसळल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल
नगर तालुक्यात यंदा बहुतांश ठिकाणी कांदा लागवड झाली आहे. परंतु बदलत्या हवामानामुळे कांदा पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच गेल्या चार दिवसांपासून कांद्याचे भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा चिंतेत पडला आहे. कांद्यावरील निर्यात शुल्क हटविण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.