अहिल्यानगर | नगर सह्याद्री
चितळे रस्त्यावर भराड गल्ली येथे महिनाभरापूव नव्याने करण्यात आलेला काँक्रिटचा रस्ता विनापरवाना खोदून महापालिकेच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी प्रभाग अधिकारी राकेश कोतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक ओसवाल व विलास तिरमल (पूर्ण नावे नाहीत, दोघे रा. भराड गल्ली, चितळे रोड, अहिल्यानगर) यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी दुपारी आयुक्त यशवंत डांगे यांनी प्रभाग अधिकारी राकेश कोतकर यांना भराड गल्ली येथे नव्याने केलेला रस्ता फोडण्यात आल्याची माहिती देत तपासणीच्या सूचना दिल्या. प्रभाग अधिकारी कोतकर, स्वच्छता निरिक्षक प्रसाद उमाप व अतिक्रमण विभाग लिपीक नितिन इंगळे यांनी पाहणी केली असता रस्ता फोडलेला दिसला.
अशोक ओसवाल व विलास तिरमल यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता, नव्याने केलेला सिमेंटचा कॉक्रीटचा रस्ता विनापरवाना फोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचे समोर आल्यावर त्यांनी आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांना याची माहिती दिली. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी कठोर कारवाईचे आदेश देत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार राकेश कोतकर यांनी सोमवारी सायंकाळी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक ओसवाल व विलास तिरमल (दोघे रा. भराड गल्ली, चितळे रोड, अहिल्यानगर) यांच्या महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच, आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी महानगरपालिकेच्या बांधकाम विभागातील शहर अभियंता, उपअभियंता व ठेकेदार यांना स्पष्ट सूचना देताना, नव्याने ज्या ठिकाणी रस्ता तयार करण्यात येतो, त्या ठिकाणी असलेली घरे, दुकाने यांची पाण्याची लाईन, ड्रेनेज लाईन व अंतर्गत लाईनची वस्तुस्थिती तपासून त्या सुस्थितीत असल्याची खात्री केल्यानंतरच संबंधित ठेकेदारास पुढील काम करण्याची सूचना द्यावी, असे बजावले. एकदा काम केल्यानंतर पुन्हा रस्ता फोडला जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसे झाल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल व संबंधितांकडून नुकसान भरपाई केली जाईल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.