मुंबई । नगर सहयाद्री:-
शिल्पा शेट्टी ही केवळ एक यशस्वी अभिनेत्री आणि फिटनेस आयकॉन नसून, एक प्रेमळ आणि काळजी करणारी बहीणसुद्धा आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ (सीझन 3) च्या राखी विशेष भागात शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टी या बहिणींनी एकत्र हजेरी लावली आणि त्यांच्या गोड नात्याने प्रेक्षकांची मनं जिंकली.
या भागात शिल्पाने मस्करीच्या अंदाजात एक मोठा खुलासा केला ती अनोळखी पुरुषांना विचारते की “लग्न झालं का?” आणि नंतर लगेच स्पष्टही करते की, “हा प्रश्न माझ्यासाठी नाही, तर माझ्या बहिणीसाठी आहे!” तिच्या या मिश्कील आणि सच्च्या कबुलीजबाबावर प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. शोमध्ये कपिल शर्माने हुमा कुरेशी डेटिंग अॅप वापरत असल्याचा उल्लेख केला, तेव्हा शिल्पाने शमिताला चटकन सुचवलं – “तिथे जाऊन बघ.” यावर हसत शमिताने स्पष्ट सांगितले की, खरं प्रेम शोधणं आजच्या काळात सोपं नाही. चुकीच्या नात्यापेक्षा सिंगल राहणं तिला जास्त योग्य वाटतं.
शोमध्ये दोघींनी त्यांच्या कडक आईच्या आठवणीही शेअर केल्या. शिल्पा आणि शमिता म्हणाल्या की, “आई शिस्तीबाबत फारच काटेकोर होती. कधी झाडू, तर कधी चप्पलही वापरली गेली!” हे सांगताना दोघीही हसत होत्या, पण त्या आठवणींमध्ये एक गोडवट सच्चाई होती. शमिता म्हणाली, “आईमुळे आम्ही दोघीही सावरलो.” या एपिसोडमध्ये फक्त विनोदच नाही, तर भावनिक आणि कौटुंबिक गोडवाही पाहायला मिळाला. शिल्पा आणि शमिता यांच्यातील सच्चं, जिव्हाळ्याचं आणि एकमेकांची काळजी घेणारं नातं या शोमधून स्पष्ट दिसून आलं.