जामखेड । नगर सहयाद्री:-
जामखेड तालुक्यामध्ये विविध ठिकाणी घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपींची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली. निंबाळकर आसाराम भोसले, आहिलाश्या उर्फ जाधव उर्फ झोळया जंगल्या भोसले, कौशल्या अहिलाश्या भोसले, महादेव सुखदेव भोसले सर्व ( रा. ता.आष्टी, जि.बीड ) अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत. या सराईत आरोपींकडून पथकाने 2 लाख 30 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
जामखेड तालुक्यातील धोत्री येथील काकासाहेब रामदास अडाले कुटुंबियासह लग्नाकरीता बाहेरगावी गेले असताना त्यांच्या राहत्या घरी मंगळवार (ता. ३) रोजी घरफोडीची घटना घडली होती. यात चोरांनी अडाले यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून रोख रक्कम सोन्याचे दागिने असा मुद्देमाल लंपास केला. या संदर्भात अडाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून घेतला होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सदर घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी या घटनेचा तपास करण्यासाठी पोनि/हेमंत थोरात, पोलीस अंमलदार बबन मखरे, हृदय घोडके, फुरकान शेख, संतोष खैरे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मेघराज कोल्हे, ज्योती शिंदे, सारिका दरेकर व उमाकांत गावडे यांचे पथक तयार केले.
या पथकाने परिसरातील सराईत आरोपींची माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी पथकाला माहिती मिळाली की, धोत्री येथील येथील घरफोडी निंबाळकर आसाराम भोसले व त्यांच्या साथीदारांनी केली आहे. हे आरोपी चोरीचे सोने विकण्यासाठी गुगळे प्लॉटींग, जामखेड येथे येणार आहेत. त्यानुसार पथकाने सापळा रचून संशयीत आरोपींना ताब्यात घेतले.
तपास पथकाने वरील आरोपीकडे अधिक विचारपुस केली असता आरोपीतांनी सदरचा गुन्हा रामेश्वर जंगल्या भोसले (फरार) याचे मदतीने केला असल्याची माहिती दिली तसेच साथीदार रामेश्वर जंगल्या भोसले यांचेसह जामखेड, कर्जत व खर्डा येथे घरफोडी केल्याचे सांगितले. त्यानुसार सहा गुन्ह्यांची उकल झाली आहे. आरोपींना जामखेड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असुन पुढील तपास जामखेड पोलीस करत आहे.