अहिल्यानगर | नगर सह्याद्री
जिल्ह्यातील अनेक पतसंस्था पदाधिकारी, संचालक आणि व्यवस्थापक यांना हाताशी धरुन त्या पतसंस्थांमधील कोट्यवधीची रक्कम हडप करणारा मास्टरमाईंड पोपट ढवळे याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पहाटेच्या सुमारास अटक केली. अनेक दिवसांपासून पोपट ढवळे हा पोलिसांना गुंगारा देत होता. ढवळे याच्या अटकेने आता नगर शहरासह पारनेर, श्रीगोंद्यातील अनेक नावाजलेल्या पतसंस्थांचे घोटाळे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषत: पारनेर तालुक्यातील राजे शिवाजी, गोरेश्वर या दोन पतसंस्थांमधील आर्थिक घोटाळ्यात पोपट ढवळे याचा मोठा वाटा राहिल्याचे तपासात समोर आले आहे. ढवळे याने या दोन पतसंस्थांच्या संचालकांसह पदाधिकाऱ्यांना हाताशी धरुन कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलले! ठेवीदारांचा त्यातून विश्वासघात झाला असून ठेवीदारांना त्यांच्या ठेवी मिळणे देखील दुरापास्त झाले आहे. पोपट ढवळे याने एकच मालमत्ता चार- सहा संस्थांना गहाण दिली असल्याचे प्रकार समोर आले आहेत. पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांना याची जाणिव असतानाही त्यांनी ढवळे याच्याकडून मिळणाऱ्या कमिशनपोटी हे सारे केल्याचे समोर आले आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने पोपट ढवळे याच्या मुसक्या आवळल्या असल्या तरी त्याला बोलते करून बडेमासे अटक होण्याची गरज आहे. त्यातून मोठे स्कँडल उघडकीस येण्याची शक्यता आहे. बोगस कर्ज प्रकरणाने पारनेर तालुक्यातील राजे शिवाजी आणि गोरेश्वर या पतसंस्था अडचणीत आल्या. या संस्थांवर सध्या प्रशासक आहेत. कोट्यवधी रुपयांच्या ठेवी या पतसंस्थेत अडकल्या आहेत. या दोन्ही पतसंस्था अडचणीत आणण्याचे पाप वांगदरी (श्रीगोंदा) येथे स्थायिक झालेले पोपट ढवळे याचे आहे. राजेंद्र नागवडे यांच्याशी संबंधित ज्ञानदिप शिक्षण संस्थेतीलपोपट ढवळे व त्याच्या 15 सहकाऱ्यांच्या नावावर जवळपास प्रत्येकी दीड कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे दिसते. या कर्मचाऱ्यांनी आपल्याला कर्जाची ही रक्कम मिळालीच नसल्याचे म्हटले आहे. कोट्यवधी रुपयांची ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या नावावर असली तरी प्रत्यक्षात ही रक्कम त्यांनी घेतली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मग ही रक्कम कोणी घेतली असाही प्रश्न आहे. राजे शिवाजी पतसंस्थेचे तत्कालीन चेअरमन आझाद ठुबे आणि गोरेश्वर पतसंस्थेचे चेअरमन बाजीराव पानमंद यांच्याशी संधान साधून पोपट ढवळे याने कोट्यवधी रुपयांचे विनाजामिनकी आणि विनातारणाचे कर्ज घेतल्याचे आता तपासात समोर आले आहे.
हे कर्ज देताना पतसंस्था पदाधिकाऱ्यांना कमिशन देण्यात आल्याची चर्चा आहे. कर्ज स्वरुपात कोट्यवधी रुपयांचे कर्ज पोपट बोल्हाजी ढवळे याच्यासह त्याचा मुलगा सागर पोपट ढवळे, सतीष अशोक जामदार, अनिल शामराव कणसे, संजय दळवी, विलास शितोळे यांच्यासह 18 कर्मचाऱ्यांच्या नावाने राजे शिवाजी आणि गोरेश्वर या पतसंस्थांचे कर्ज उचलण्यात आले. या शिक्षण संस्थेचे राजेंद्र नागवडे हे पदाधिकारी आहेत. या कर्मचाऱ्यांच्या पगारातून वसुली करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असतानाही राजेंद्र नागवडे हे त्या कर्मचाऱ्यांचे पगार कपात होऊ देत नसल्याचा आरोप ठेवीदार संघर्ष समितीने या आधीच केला आहे. दरम्यान, पोपट ढवळे याला गुन्हे शाखेच्या पथकाने न्यायालायासमोर हजर करण्याची प्रक्रिया राबविली असून त्याच्याकडून अधिकची माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
एकाच मालमत्तेवर तीन संस्थांचे कोट्यवधींचे कर्ज घेणारा पोपट ढवळे पॅटर्न!
हवेली (पुणे) तालुक्यातील वाडेबोल्हाई या गावात गट नं. 46 मध्ये पोपट बोल्हाजी ढवळे, सागर ढवळे, राजेंद्र शिवाजीराव नागवडे, अजित बाळासाहेब अवताडे, संदेश आव्हाळे,संतोष काळे, रेखा अवताडे यांची नावे असणारे 8 हेक्टर 84 आर क्षेत्र असणारा सातबारा उतारा आहे. या एकाच मालमत्तेवर पारनेरमधील तीन पतसंस्थांकडून 80 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले. हे कर्ज घेताना पोपट ढवळे हाच मास्टरमाईंड राहिला. त्याने चार- चार दिवसाच्या फरकाने पंधरा दिवसात या पतसंस्थांकडून 80 कोटी घेतले. पहिल्या पतसंस्थेचा बोजा चढण्याआधी दुसरीचे कर्ज आणि पहिल्या आणि दुसऱ्या पतसंस्थेचे बोजा चढविण्याचे पत्र येण्याआधी तिसऱ्या पतसंस्थेचे कर्ज घेतले गेले. पतसंस्थांना मोठ्या प्रमाणात गंडवले गल्याचे लक्षात येताच यातील एका पतसंस्थेने या क्षेत्रावर जप्ती आदेश घेतला आणि 85 लाख 27 हजार 403 रुपयांचा बोजा चढविला. पतसंस्थेने सदरची जमिन न्यायालयाच्या आदेशाने जप्त केली. त्यानुसार वाडेबोल्हाई येथील तलाठ्याने 22 ऑस्टोबर 2024 रोजी त्याच्या सहीने फेरफाराच्या नोंदवहित त्याची नोंद घेतल्याचेही समोर आले आहे.
‘राजे शिवाजी पतसंस्था’ हे तर भ्रष्टाचारातील हिमनगाचे टोक!
पारनेर तालुक्यातील राजे शिवाजी पतसंस्थेत व्यवसायाने वकिल असणारे आझाद ठुबे हेच सर्वेसर्वा होते. आझाद भाऊंनी निर्णय घ्यायचा आणि संचालकांनी ‘भाऊ म्हणतील तसं!’ असं बोलायचं! आझाद ठुबे यांना श्रीमंत होण्याची हाव सुटली आणि त्यांना याच पोपट ढवळे याने हेरले! त्यातूनच त्याने आझाद ठुबे यांच्याशी सलगी वाढवली. कमिशनच्या रकमेचे मोठे अमिश त्याने दाखवले. त्यातूनच त्याने राजे शिवाजी पतसंस्थेत आझाद ठुबे यांना त्यांच्या पत्नी, मुलगा, सासू, मेहुणे यांच्या नावावर कर्ज काढण्यास भाग पाडले. त्यातून कोट्यवधी रुपये बाहेर आले आणि पतसंस्थेने गटांगळ्या खाल्या! ढवळे याच्यामुळे ही पतसंस्था अडचणीत आली असली तरी हे फक्त हिमनगाचे टोक मानले जात आहे.
पोपट ढवळे हा नागवडेंच्या शिक्षण संस्थेतील कर्मचारी!
शेकडो कोटींचा गफला करणारा पोपट ढवळे हा श्रीगोंद्यातील बडे राजकीय प्रस्थ समजल्या जाणाऱ्या राजेंद्र नागवडे यांच्या शिक्षण संस्थेत पोपट ढवळे हा कर्मचारी म्हणून काम पाहत होता. याच संस्थेत काम करत असताना त्याने जमिन खरेदी- विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यातूनच पुढे त्याने या व्यवसायात जम बसविला. पुढे जाऊन त्याने या शिक्षण संस्थेतून निवृत्ती घेतली आणि पूर्णवेळ खरेदी- विक्री व्यवसाय सुरू केला.
पारनेरमधील हंगे गावचा रहिवासी!
पतसंस्थांसह त्या संस्थांमधील ठेवींवर डल्ला मारणारा पोपट ढवळे हा पारनेर तालुक्यातील हंगा या गावचा रहिवाशी आहे. त्याचे हेच मुळ गाव! याच गावात लहानाचा मोठा झालेल्या पोपट ढवळे याला मोठे पणाची भारी हौस! त्यातूनच त्याने लहान वयापासूनच अनेकांना टोप्या टाकल्या! त्यात पुढे शिक्षकाची नोकरी मिळाल्यानंतर हे थांबेल असे वाटत असताना प्रत्यक्षात टोप्यांची संख्या वाढली आणि ढवळे याने अनेकांना टोप्या घातल्या!
मतपत्रिकांचा बाजार मांडणारा पारनेरचा गणेश पॅटर्न!
सेवा सोसायट्यांच्या निवडणुका, पतसंस्थांच्या निवडणुका सहकार विभागाच्या नियंत्रणात होतात. पारनेर तालुक्यातील अनेक पतसंस्था आणि सोसायट्यांच्या निवडणुकांमध्ये गणेश औटी याने थेट हस्तक्षेप केला. संस्थांचे सभासद वाढवून देण्यापासून ते अगदी मतपत्रिका वाढवून त्या मतपत्रिकांची मोजणी करण्यापर्यंत त्याने टेंडर काढले. सोसायटीत शंभर- दोनशे- तीनशे मतदार वाढवणे, तितक्याच बोगस मतपत्रिका मतपेटीत टाकणे अशी कामे त्याने लिलया पार पाडली. यासाठी त्याने काही खासगी माणसंच नियुक्त केले होते. याशिवाय तत्कालीन लोकप्रतिनिधींसह काही गावांमधील मोठी राजकीय धेंड देखील त्याने हाताशी धरली होती. त्यातून या गणेश औटी याने स्वत:चा गणेश पॅटर्न राबवून स्वत:चा आर्थिक फायदा उठविला. यातून सहकारातील गैरप्रकार फोफावला आणि संस्थांचे कामकाज देखील संपले.
पतसंस्था पदाधिकारी, संचालकांचे पितळ उघडे पडण्याची शक्यता!
पोपट ढवळे याला पहाटे अटक झाल्याचे वृत्त येताच सहकारात मोठी खळबळ उडाली. पारनेर, श्रीगोंद्यातील काही पतसंस्था संचालकांसह पदाधिकाऱ्यांचे यातून धाबे दणाणले. विशेषत: पारनेर तालुक्यातील दोन नामांकीत पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी ढवळे याला कर्ज दिले आहे. त्याचे हे कर्ज अडचणीत आणणारे आहे. या कर्जापोटी त्या पतसंंस्थांंच्या पदाधिकाऱ्यांनी मोठी रक्कम कमिशन म्हणून घेतल्याची चर्चा अनेक दिवसांपासून झडत आहे.
सहकाराचा भक्षक झालेल्या गणेश औटीला सहआरोपी करा!
पतसंस्थांच्या माध्यमातून चालणारा कारभार योग्य पद्धतीने चालतो किंवा नाही यासह तेथील आर्थिक शिस्तीवर लक्ष ठेवण्याच्या उद्देशाने सहकार विभागाचे अधिकारी- कर्मचारी काम करत असतात. पारनेरमध्ये तेच अपेक्षीत होते. मात्र, झाले भलतेच! येथील गणेश औटी या अधिकाऱ्याने पतसंस्थांसह सहकारातील सर्वच संस्थांमधून दरमहा हप्ता सुरू केला. दरमहा विशिष्ट रक्कम त्याला पोहोच होऊ लागली. त्यातून संस्थांचे पदाधिकारी मनमानी करू लागले. सेवा सोसायट्या देखील या गणेश औटीच्या हप्तेखोरीतून सुटल्या नाही. मुळचा पारनेरचाच भुमिपुत्र असणाऱ्या या गणेश औटी याने ‘विखेंचे राजकारण संपविणार असल्याचे माझी काळी जीभ मला सांगते,’ असे जाहीर वक्तव्य केले होते. त्याआधी निलेश लंके यांच्या लगारीला लागून राहिलेल्या याच गणेश औटी याने पुढे विखेंची लगारी धरली. विखेंचे बुट चाटू लागला आणि दुसरीकडे सहकारी संस्थांमधील हप्तेखोरी आणखी जोरात करू लागला. ज्या पतसंस्था याच गणेश औटी याच्या हप्तेखोरीने अडचणीत आल्या, त्याच पतसंस्थांवर त्याने प्रशासक म्हणून आपली स्वत:ची नियुक्ती मिळवली. कर्जदारी आणि ठेवीदार यांचे आकडे बाहेर काढत त्याने कमिशनचा बाजार मांडला! गणेश औटी याची पारनेरमधून बदली झाली असली तरी नगर मुख्यालयात आहे. तेथे बसून तो रोजच्या रोज पारनेरमधील सहकाराचा बाजार मांडत बसला आहे. त्यामुळे एकूणच सहकारातील स्वाहाकारात बरबटलेल्यांंना अटक करताना या गणेश औटी याला देखीली सहआरोपी करण्याची मागणी पारनेरमधील ‘आधार ट्रस्ट’ने सहकार मंत्र्यांसह विखे पाटलांकडे केली आहे.