जालना । नगर सहयाद्री:-
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणात जालना पोलिसांनी आणखी एक आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी बीड शहरातून धनंजय मुंडे यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांचन साळवे याला मंगळवारी रात्री उशिरा ताब्यात घेऊन अटक केली.
याआधी दादा गरुड, अमोल खुणे यांना पोलिसांनी अटक केली असून चौकशी करण्यात येत आहे. दादा गरुड आणि अमोल खुणे यांच्याशी कांचन नावाच्या व्यक्तीचा सबंध असल्याचा आणि तो धनंजय मुंडे यांचा PA असल्याचा उल्लेख आणि आरोप मनोज जरांगे यांनी केला होता. मंगळवारी रात्री उशिरा कांचन साळवी याला जालना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. चौकशीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली. आज त्याला जालन्यातील अंबड येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
दरम्यान साळवी याला अटक केल्यानं आता या प्रकरणात साळवी पोलिसांकडे काय खुलासे करतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि सहकाऱ्याची हत्या करण्यासाठी अडीच कोटींची सुपारी देण्यात आलयाचा खुलासा झाला. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. मनोज जरांगे पाटील आणि समर्थकांनी याबाबत जालना पोलिसात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांकडून त्यानंतर तपास करण्यात येत आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी हत्येच्या कटाचा आरोप आमदार धनंजय मुंडे यांच्यावर केला होता. धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली होती, माझ्याकडे पुरावे आहेत, असा आरोप जरांगेंनी केला होता. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. धनंजय मुंडेंनी आपल्यावरील आरोपाचे खंडन केले होते. आता जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या समर्थकाला अटक केली आहे. साळवी पोलिसांसमोर काय काय उघड करणार? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.



