नगर- कल्याण हायवेचे काम अतिशय निकृष्ट | अधिकाऱ्यांसह- लोकप्रतिनिधींचे अर्थपूर्ण दुर्लक्ष
पेवर मशिनऐवजी मजुरांकडून सिमेंटमिक्सींग अन् सिमेंटचा पोचारा | वाडीवस्तीच्या रस्त्यासारखी ट्रीटमेंट
ऑन द स्पॉट रिपोर्ट / शिवाजी शिर्के
केंद्रात रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील अनेक रस्त्यांची कामे मार्गी लावली. दहा वर्षांपूव नगर- कल्याण- विशाखापट्टणम या महामार्गासाठी काही कोटीत निधी दिला आणि हा रस्ता अतिशय उत्कृष्टदर्जाचा तयार झाला. नगर शहर मुख्यालयाला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांपैकी हा एकमेव असा दर्जेदार रस्ता राहिला. मात्र, तरीही या अतिशय सुव्यवस्थीत असणाऱ्या डांबरी रस्त्यावर सिमेंट रस्ता तयार करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च सुरू झाला आणि या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आले.
नगरपासून टाकळी ढोकेश्वर आणि पुढे पुणे जिल्हा हद्दीपर्यंत हा रस्ता सध्या सुरू आहे. या रस्त्यावर पेवर मशिनद्वारे काही काम केले असताना गेल्या सात दिवसांपासून ही मशिन रस्त्याच्या बाजूला उभी ठेवण्यात आली आणि हायवाच्या माध्यमातून रस्त्यावर सिमेंट ओतून ते सिमेंट लेबरच्या माध्यमातून रस्त्यावर पांगवले जात आहे. वाडी- वस्त्यांवर अशा प्रकारचे रस्ते केले जातात आणि ते काही महिन्यातच पुन्हा उखडले जातात. कल्याण हायवे जर अशा पद्धतीने सिमेंट काँक्रीटचा होणार असेल तो पुढच्या काही दिवसातच उखडला जाणार हे नक्की! सर्वांच्या नाकावर टिच्चून हे काम चालू असताना त्याबाबत कोणीही हरकत घ्यायला तयार नाही. अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी देखील चुप्पी साधल्याने टक्केवारीची पाकीटे नक्कीच पोहचली असणार!
खासदार लंके अन् आमदार दाते या दोघांच्या आशिर्वादानेच अवैध टोलवसुली!
रस्त्याचे काम चालू असताना टोल वसुली करताच येत नाही. याच अनुषंगाने आ. काशिनाथ दाते यांनी याबाबत मध्यंतरी आवाज उठवला आणि ही टोल वसुली थांबवा अशी आग्रही मागणी केली. याबाबत राज्य सरकारचे लक्ष वेधल्याच्या बातम्याही छापून आल्या. मात्र, या मागणीचे पुढे काय झाले. आ. दाते या विषयावर अचानक गप्प का झाले? की त्यांना गप्प केले गेले? टोलचा झोल नक्कीच चालू आहे हे यातून स्पष्टपणे समोर आले आहे. खासदार निलेश लंके हे सामान्यांच्या हिताच्या गोष्टी करत असतात. त्यांच्याच तालुक्यात हा टोलचा झोल चालू आहे. तेही या विषयावर अवाक्षर बोलत नाहीत! खासदार निलेश लंके अन् आमदार काशिनाथ दाते या दोघांच्या आशिर्वादानेच ही अवैध टोलवसुली चालू असल्याची दबक्या आवाजातील चर्चा आता जाहीरपणे होऊ लागली आहे.
रस्त्याचे काम चालू तरीही टोल वसुली कशी?
नगर- कल्याण या संपूर्ण रस्त्याचे काम चालू आहे. गेल्या सात- आठ महिन्यांपासून वाहन चालकांना या कामाने त्रास होत आहे. रस्त्याचे काम चालू असतानाही या रस्त्यावरील टाकळी ढोकेश्वर (ढोकी) आणि ओतूरजवळील टोल नाक्यावरुन राजरोसपणे टोल वसुली चालू आहे. वास्तविक काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा टोल वसुली होण्याची आवश्यकता असताना या रस्त्यावर राजरोसपणे टोल वसुली कशी होते असा सवाल वाहन चालकांना पडला आहे.
देवेंद्रजी, टोलचा झोल कोणाच्या आशिर्वादाने!
रस्त्याचे काम चालू असतानाही होणारी टोल वसुली ही अवैधच आहे. हा एक प्रकारे वाहन चालकांच्या खिशावर टाकला जाणारा दरोडाच आहे. ज्याची त्याची टक्केवारी पोहोचत असेल तर मग सामान्यांनी न्याय कोणाकडे मागायचा! स्वच्छ आणि पारदश कारभाराचा दावा ठोकणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच यात लक्ष घालण्याची गरज आहे. गेल्या आठ- दहा महिन्यात अवैधपणे झालेली टोलवसुली कोणाच्या आशिर्वादाने झाली याची चौकशी होण्याची आणि त्याचा अहवाल जनतेसमोर येण्याची आवश्यकता आहे.
सलग काम करण्याऐवजी अनेक ठिकाणी एक्झीट!
पेवर मशिनच्या माध्यमातून रस्त्यावर ओतले जाणारे सिमेंट पोकलेनच्या सहाय्याने पांगवणे आणि ते पेवर मशिनद्वारे दाबून रस्ता तयार करणे आवश्यक होते आणि आहे. काही ठिकाणी अशाच पद्धतीने काम केले असले तरी रस्त्याचे काम सलगपणे करण्याऐवजी ठेकेदार आणि त्याच्या यंत्रणेला चिरीमीरी देत रस्त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांनी अनेक ठिकाणी दहा- दहा मीटर काम सोडून देण्यास भाग पाडले. त्यामुळे रस्त्याचे काम सलग झाले नाही. सोडण्यात आलेल्या या दहा मिटरमध्ये नंतर मजुरांच्या हाताने सिमेंट पांगवले गेले आणि सोपस्कर पूर्ण केले गेले. त्यामुळे अशा ठिकाणी रस्त्याची सलगता राहिली नाही आणि वाहन हेलकावे खात जाते.
अनेक पुल अरुंद, रुंदी न वाढवता रस्त्याचे काम!
रस्त्याचे काम सुरू करण्याआधी अनेक ठिकाणी जुने पूल आहे. काही ठिकाणी सिमेंट नळ्यांचे तर काही ठिकाणी सिमेंट स्लॅबचे पुल आहेत. सध्याच्या रस्त्याचे काम हाती घेण्याआधी या पुलांचे रुंदीकरण होणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही. आता सिमेंट रस्ता त्या पुलाला अगदी जवळून झाला असल्याने या पुलांवर अपघात होणे सुरू झाले असून त्याचे प्रमाणही वाढणार आहे. या पुलांची रुंदी वाढविण्याचे काम तातडीने झाले नाही तर होणाऱ्या अपघातांना ठेकेदार आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांना जबाबदार धरुन त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्यासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे.
अपघातांची मालिका तरीही ठेकेदाराची टोळी निर्धास्त!
रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून आतापर्यंत जिल्हा हद्दीत जवळपास दोन हजारापेक्षा जास्त अपघात झाले. यात शेकडो जणांचा जीव गेला तर काहींना कायमचे अपंगत्व आले. याला सर्वस्वी ठेकेदार आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्षच कारणीभूत ठरले. अपघातांची मालिका थांबायला तयार नसताना ठेकेदार आणि त्याची टोळी निर्धास्त आहे. त्यांच्या घरातील कोणा एकाचा यात जीव गेला अथवा त्यांना अपंगत्व आले तर ते असे करणार का या प्रश्नाचे उत्तर ते देतील का?
आवाहन : अपघातात जीव गेलेल्यांच्या नातेवाईकांसह अपंगत्व आलेल्यांनी संपर्क करा!
रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा करत हजारो कुटुंबांना वेदना देणाऱ्या ठेकेदार आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात न्यायालयीन लढाई लढण्यासाठी नगर सह्याद्री परिवार सज्ज झाला आहे. ज्यांना अपंगत्व आले त्यांच्यासह ज्यांचा जीव गेला त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देणे आणि ठेकेदारासह त्याचे अधिकारी आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत ही न्यायालयीन लढाई केली जाणार आहे. या रस्त्याच्या कामाची ज्यांना झळ बसली आहे त्यांनी ‘नगर सह्याद्री’ शी संपर्क साधावा!