शहरात कोणत्याही क्षणी उद्रेक होणार | सर्वाधिक आका एकट्या नगर अन् पारनेरमध्ये!
सारिपाट / शिवाजी शिर्के
पोलिस आणि महसूल प्रशासन हाताशी असले (नव्हे दिले की) की वाट्टेल ते आणि हवे ते पदरात पाडून घेताना आडवा येणार्याला सरळ करण्याची राजनीती नवीन नाही. बीडमधील मस्साजोग घटनेनंतर ती समोर आली इतकेच! बीडमध्ये घरगडी असणार्या वाल्मिकअण्णाचा पाहता पाहता आका झाला! दीड डझन गुन्हे दाखल असतानाही जिल्ह्याचा कलेक्टर, एसपी त्याला पाहताच खुर्चीतून उठायचा! तो सांगेल ते काम कायद्यात बसत नसतानाही करायचा! अण्णाचं नाव सांगितलं अन् काम झालं नाही असं झालंच नाही. बीडमधील हा वाल्मिकअण्णा सरपंचाच्या खुन प्रकरणानंतर चर्चेत आला. मात्र, त्या अण्णापेक्षाही भयंकर अण्णा अन् आका नगर जिल्ह्यात गेल्या दहा वर्षात तयार झालेत! अनेक आमदारांपेक्षा त्यांच्या आकांची दहशत निर्माण झालीय! शेजारीच असणार्या बीडमध्ये हे सारं घडलं असताना आपल्याकडे सारं काही अलबेल आहे आणि आपल्याकडे एकही वाल्मिकअण्णा नाही असं नगरचे कलेक्टर अन् एसपी समजत असतील तर..! जिल्ह्याचं मुख्यालय असणारं नगर शहर प्रचंड अस्वस्थ आणि अशांत आहे. खबर्यांमार्फत जरा कानोसा घेण्याची गरज आहे. शहरात कोणत्याही क्षणी मोठा उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे. त्या उद्रेकाच्या पाठीमागे शहरावर वर्चस्व कोणाचे हेच एकमेव कारण आहे. हे वर्चस्व राजकीय जसे वाटते तसेच दहशतीच्या बाबत देखील! काही मोठ्या आकांच्या छोट्या आकांमध्ये सध्या सुप्त संघर्ष चालू आहे. त्यात त्यांच्या मोठ्या आकांचा आदेश आला की संघर्षाची सुरुवात झाली म्हणून समजा! नगर शहराखालोखाल सर्वाधिक आका निर्माण झालेले दिसतात ते पारनेर तालुक्यात! पारनेरमधील नेत्यांपेक्षा या आकांना पोसण्याचे काम पारनेरचे महसूल प्रशासन जसे करत आहेत तसेच पारनेर- सुपा पोलिस ठाण्यातील फौजदार करतात हे अत्यंत वाईट! लक्ष कोणी घालायचे आणि आवर कोणी घालायचा? कलेक्टर- एसपी या दोघांनीही यातील गांभिर्य ओळखण्याची गरज आहे.
राज्यकर्त्यांच्या जोडीने विविध राजकीय नेते, पोलिस अधिकारी आणि महसूल प्रशासनासोबत साटेलोटे निर्माण झालेले अनेक वाल्मीकअण्णा नगरमध्ये तयार झाले आहेत. या सार्यांना अभय देण्याचे काम राजरोसपणे होत आहे. राजाश्रय, पोलिस आणि महसूल यंत्रणेचे पाठबळ या त्रिसूत्रींचा हात आहे तोपर्यंत नगर जिल्ह्यातील वाल्मिकअण्णांच्या कृष्णकृत्यांचा पर्दाफाश होणार नाही. यासाठी राज्य सरकारने सखोल चौकशी करून या साटेलोट्याची मुळे शोधून काढण्याची गरज आहे. त्यातूनच अण्णासाहेब हजारे, पोपटराव पवार या समाजसेवकांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्या, श्रद्धा अन् सबुरीचा संदेश देणार्या शिर्डीतील साईबाबांच्या जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहणार आहे.
शेजारच्या बीड जिल्ह्याचे नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या घरातील एक साधा घरगडी अशी वाल्मिकची ओळख होती आणि त्यापलीकडे जाऊन त्याला फारसे कोणी ओळखत नव्हते की, त्याची फारशी कोणी दखलही घेत नव्हते. मात्र, १९९५ साली राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता आली. गोपीनाथ मुंडे हे राज्याचे नेतृत्व करीत असताना याच दरम्यान बीड जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय सूत्रे हाताळायचे काम वाल्मीकने सुरू केले आणि बघता बघता अवघा बीड जिल्हा वाल्मीकने आपल्या पंखाखाली घेतला.
युती शासनाच्या पाच वर्षांच्या कालावधीत बीड जिल्ह्याचे प्रशासन म्हणजे वाल्मीक म्हणेल ती पूर्व दिशा, असे जणूकाही सूत्रच ठरून गेले होते. बीड जिल्ह्यातील बहुतांश शासकीय आणि पोलिस अधिकारी तर वाल्मीकची थुंकी झेलायलाही नेहमी सिद्ध असायचे. जिल्हा प्रशासनातील बहुतांश अधिकार्यांच्या बदल्या या वाल्मीक अण्णाच्या शिफारशीशिवाय होतच नसायच्या. त्याचा परिणाम असा झाला की जिल्ह्याचा कलेक्टर, एसपी त्या वाल्मिकला उभा राहून सलामी ठोकू लागला. त्यातून हा घरगडी हळूहळू स्वतःला बीडचा मालकच समजायला लागला. मुंडे यांच्या घराण्यात फूट पडली आणि पंडितअण्णा मुंडे व धनंजय मुंडे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. याच दरम्यान वाल्मीक यानेही गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडत धनंजय मुंडे यांच्याशी जवळीक साधली. याच दरम्यान गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले आणि बीड जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्रे धनंजय मुंडे यांच्या हातात आली आणि ओघानेच मुंडे यांच्या अंडेपिल्ल्यांची खडानखडा माहिती असलेला वाल्मीकही हळूहळू शिरजोर होत जिल्ह्याचा आका म्हणून ओळखला जाऊ लागला. नगरची वाटचाल सध्या त्याच दिशेने चालू आहे!
नगर जिल्ह्यात एकही तालुक्यात आका नाही, वाल्मिक अण्णा नाही असं छातीठोकपणे कोणीच सांगू शकत नाही. पोलिस जर खर्या अर्थाने त्यांची भूमिका बजावत असतील, गुन्हेगारांवर त्यांचा जरब असेल आणि त्यांच्या कुंडलीची नोंद त्यांच्याकडे असेल तर जिल्हा पोलिस प्रशासनाने जिल्ह्यातील तालुकानिहाय आकांची, वाल्मिक सारख्या समाजविघातक प्रवृत्तींची यादी तयार करण्याची गरज आहे. त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची गरज आहे.
तिकडे आका अन् इकडे त्याच्या दुप्पट गरम राहिलेल्या किटल्या!
चहापेक्षा किटली गरम, असं नगरमध्ये उपरोधिकपणे बोलले जाते. नगर जिल्ह्यातील बहुतांश नेत्यांकडे किटल्यांची संख्या मोठी आहे. या किटल्या आडव्या येत असल्याने नेत्यांनाही नक्की काय चाललं आहे हे समजायला मार्ग नाही. त्या- त्या तालुक्यातील नेत्यांपेक्षा त्यांच्या या किटल्याच त्यांना अडचणीत आणत आहेत. त्याचा प्रत्यय नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पारनेर, संगमनेर, नेवासा, राहुरी येथील पराभूत झालेल्या उमेदवारांना नक्कीच आलाय! हाताखाली असणारे पीए, त्यांनी नेत्याच्या आडून जमविलेली माया, विनाकारण अनेकांना दिलेला त्रास, किटल्यांनी गावागावात वठवलेली चुकीची भूमिका आणि त्यातून दुरावलेली गावेच्या गावे विधानसभा निवडणुकीत थेटपणे विरोधात गेली. किटल्यांना आवरण्याचे काम झाले तर त्यातून अनेक प्रश्न मार्गी लागलेली दिसतील.
दहशत संपविणार्या केपी पॅटर्नची नगरकरांना आठवण!
नगर जिल्ह्यात आणि प्रामुख्याने नगर शहरात पंधरा-सतरा वर्षापूर्वीपर्यंत अशाच एका वाल्मिक सारख्या भाऊची दहशत होती. त्यातही त्याच्या पिलावळीची इतकी दहशत आहे की, सहसा कुणी त्याच्याबद्दल ब्र शब्द उच्चारायलाही धजत नव्हते. त्यामुळे त्याच्यासह त्याच्या पाळीव गुंडांविरुद्ध पोलिसांत तक्रार करणे तर फार लांबची गोष्ट होती. त्यातूनच भाऊंसह त्यांच्या लहान- मोठ्या आकांनी पापाचे राजंणच्या रांजण भरविले. मात्र, असे असताना पोलिस दफ्तरी त्यापैकी केवळ हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच तक्रारी दाखल झाल्या होत्या. याच दरम्यान नगर जिल्ह्याला कृष्णप्रकाश यांच्यासारखा खमका पोलिस अधीक्षक भेटला. त्यांनी कोणाचाही मुलाहीजा न ठेवता त्यावेळी जन्माला आलेल्या आकासह त्याच्या पिलावळीला ठेचून काढले. नगरकरांच्या मनातील दहशत कमी व्हावी यासाठी त्यांना खुलेआम बेड्या घालून शहरातील रस्त्यांनी फिरवले. त्यावेळी नगर शहरातील अनेक बडे आका, छोटे आका यांनी कृष्णप्रकाश यांचा प्रचंड धसका घेतला होता. मात्र, त्यांची बदली झाली आणि त्यानंतर धसका घेतलेले आका म्हणून नगर शहरात राज्य करू लागले. आता त्यात आणखी नव्या आकांची भर पडली! मात्र, हे सारे पोलिसांसमक्ष घडत असताना त्यांच्या विरोधात मोहिम राबविण्याची धमक दाखवली जात नाही! पोलिस ठाण्यात तक्रार द्यायला गेलेल्या व्यक्तीची तक्रार लिहून होण्याआधी त्या व्यक्तीच्या घरी आकाची माणसं जाऊ लागली आहेत. नगरकरांना आजही कृष्णप्रकाश यांच्यासारख्या खमक्या पोलिस अधिकार्याची आठवण येत आहे.
अण्णा हजारे शांत, पोपट पवार बोलत नाहीत; दाद मागायची कोणाकडे?
जिल्हा प्रशासनात आणि पोलिस दलात असे काही अधिकारी आणि कर्मचारी आहेत की, जे वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी तळ ठोकून आहेत. ही सगळी मंडळी नगर जिल्ह्यामधील सो कॉल्ड ‘वाल्मीकअण्णा’ याच्याशी एकनिष्ठ समजली जातात. या अधिकार्यांची आणि कर्मचार्यांची जरा कुठे बाहेर बदली झाली की, हे तालुक्या- तालुक्यातील वाल्मिक धावून येतात. सुत्रे फिरवतात अन् संबंधित अधिकारी- कर्मचारी अवघ्या काही दिवसांत पुन्हा त्याच्या पूर्वीच्या खुर्चीत बसतात. कथीत वाल्मीकने या अधिकार्यांना पोसायचे आणि या अधिकार्यांनी वाल्मीकला पोसायचे, असा हा धक्कादायक प्रकार आहे. त्यामुळेच पोसावलेली आणि सोकावलेली मंडळी इथून हाकलल्याशिवाय पर्याय नाही. ज्यांच्याकडे आशाळभूत नजरेने नगरकर पाहत आले त्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्याच तालुक्यात ही सोकावलेली आणि पोसावलेली मंडळी सर्वाधिक आहेत. पोपटराव पवार तर याबाबत शब्द बोलायला तयार नाहीत! दाद मागायची कोणाकडे? आकाची गरज असली तरी त्यांचा वापर किती आणि कुठपर्यंत करायचा याचे भान जपण्याची गरज आहे.