सारिपाट | शिवाजी शिर्के:-
लोकसभा अन् त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकांचा धुराळा खाली बसत असताना आणि नव्या वर्षाच्या स्वागतास आपण सारेच सज्ज झालो असताना राज्यातील माता- भगिनी सुरक्षित आहेत काय असा थेट प्रश्न राजगुरुनगर येथील अल्पवयीन मुलींवर अत्याचार करुन त्यांना ठार मारण्याच्या घटनेने समोर आला आहे. राज्यातील आधीच्या सरकारमधील सर्वेसर्वा आणि आताच्या सरकारमधील सर्वेसर्वा अशी ओळख असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महिला- मुली सुरक्षीत आहेत का याचे उत्तर देण्याची गरज आहे. लाडक्या बहिणीं अन् त्यांच्या लेकीबाळी आज असुरक्षीत असताना देवेंद्र फडणवीस यांना बऱ्याच उपययोजना कराव्या लागणार आहेत.
खेड (पुणे) आणि कल्याण येथे अल्पवयीन मुलींना अत्याचार करून ठार मारण्याचे गुन्हे लागोपाठ उजेडात आल्यामुळे महाराष्ट्र हादरून गेला आहे. थोड्याच दिवसांत हे वर्ष संपेल आणि काही दिवसांनी वर्षभरातल्या अत्याचारांची आकडेवारीही समोर येईल. मात्र, आत्ताच्या तपशिलांवरून असे दिसते आहे की, या सरत्या वर्षात महिलांवरील सर्वच प्रकारच्या गुन्हे आणि अत्याचारांमध्ये वाढ झालेली आहे. यातील अल्पवयीन मुलींवर किंवा क्वचित मुलांवरही होणारे अत्याचार ही सर्वाधिक वेदना देणारी बाब असून त्याबाबत सरकार, समाजसेवी संघटना, पोलिस, शाळाचालक, पालक आणि सर्व समाज यांनी नव्याने जागरूक होण्याची गरज आहे.
कल्याण आणि राजगुरूनगर या दोन्ही ठिकाणच्या संशयित आरोपींना अटक झाली असली तरी यातील कल्याणमधील प्रकरणात संशयित आरोपीला त्याच्या बायकोनेच साथ दिल्याचा प्रकार भयंकर आहे. या संशयिताने या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून नंतर मारून टाकले. त्यानंतर त्याच्या पत्नीनेच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीला साथ दिली. पोलिसांनी या आरोपीला आता शेगावमधून अटक केली आहे. या पतीपत्नीला गरज पडल्यास विशेष न्यायालय नेमून कठोर शिक्षा व्हायला हवी.
दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींचा अत्याचार केल्यानंतर मारहाण करून तसेच पाण्यात डोके बुडवून ज्या पद्धतीने खून आरोपीने केलेला दिसतो, तो प्रकार अंगावर शहारे आणणारा आहे. मुलामुलींनी आसपास खेळण्यासाठी जाणेही इतके धोकादायक झाले असेल तर 24 तास मुलांना घरात डांबून ठेवावे लागेल. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात विसापूर किल्ल्याजवळ एका पोलिसानेच मद्यधुंद अवस्थेत अवघ्या पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही बाब राज्याच्या गृहखात्याला लाजिरवाणी आहे.
गृहमंत्र्यांनी आपल्या खात्यातील संशयास्पद चारित्र्य असणाऱ्या, व्यसनाधीन आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या सर्वांना घरी पाठविल्याशिवाय या परिस्थितीत फरक पडणार नाही. बदलापूर येथे शाळेत दोन मुलींवर अत्याचार झाल्यानंतर हजारो नागरिक रस्त्यावर आले आणि पोलिसांनी संशयित आरोपीचा एन्काऊंटर केला. तेव्हा निवडणुका व्हायच्या होत्या. मात्र, सगळीकडे अशा चकमकी करून आरोपींना मारून टाकता येणार नाही. राजगुरूनगर येथे संतप्त नागरिक ‘चकमकीत मारून टाका…’ अशी उघडच मागणी करीत आहेत.
मात्र, ही न्यायदानाची पद्धत नाही आणि तशी ती रुढ होता कामा नये. जलदगदी न्यायालयात ही प्रकरणे नेऊन आरोपींना तातडीने शिक्षा मिळणे, हाच खरा उपाय आहे. देवेंद्रजींच्या राज्यात पोलिसांचा धाक संपलाय हे मान्यच करावे लागेल. आधीच्या शिंदे सरकारमध्ये देेवेंद्रजीच गृहमंत्री होते आणि आता मुख्यमंत्री झाले असतानाही हे खाते त्यांच्याकडेच आहे. लाडक्या बहिणींच्या मतावर सत्ता मिळाली असताना आता त्याच बहिणी आणि त्यांच्या लेकीबाळी असुरक्षीत झाल्यात याचे भान जपण्याची गरज आहे.