Politics News: देवेंद्र फडणवीस हे अमित शाह यांच्या मनातील मुख्यमंत्री कधीच नव्हते, ही गोष्ट सर्वांना माहिती आहे. एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेल्या मुख्यमंत्रीपदामध्ये त्यांच्या कर्तबगारीचा कोणताही वाटा नाही. तर गुजरात व्यापार मंडळाला महाराष्ट्रातून पैशांच्या थैल्या दिल्लीला पोहोचवण्यासाठी असाच बिनकण्याचा मुख्यमंत्री हवा आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. ते बुधवारी दिल्ली प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा उल्लेख एक फूल, दोन डाऊटफूल मुख्यमंत्री असा केला. या तिघांमध्ये सुरु असलेला संघर्ष महाराष्ट्र पाहत आहे. मी पुन्हा सांगतो की, अमित शाह यांच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाहीत, कधीच नव्हते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यांच्यामध्ये फार मोठे कर्तृत्व आहे का, कर्तबगारी आहे का, अनुभव आहे का, तर अजिबात नाही. दिल्लीला पैशांच्या थैल्या द्यायच्या. महाराष्ट्राची अवस्था त्यांनी दिल्लीच्या वाटेवरचे पायपुसणे अशी करुन ठेवलेय. गुजरात व्यापार मंडळाला असा बिनकण्याचा मुख्यमंत्री राज्यकर्ता हवा असतो. त्या पद्धतीने एकनाथ शिंदे काम करत आहेत, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
७० हजार कोटीच्या घोटाळ्याची मदत भाजपला होणार असेल, तसेच अजित पवारांसोबतचे इतर सहकारी ज्यांनी मिर्चीचा घोटाळा केला, बँकाच्या घोटाळ्याचे आरोप केलेल्यांच्या मदतीवर हे सरकार चालणार असेल तर माझा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कोपरापासून नमस्कार आहे. अजित पवार म्हणतात, जमिनी विकून पैसा आणू का? याचा अर्थ महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. दिल्लीने महाराष्ट्राला कंगाल केले आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.