पारनेर । नगर सहयाद्री:-
पारनेर तालुक्यातील विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्याची मागणी आमदार काशिनाथ दाते यांनी विधानसभेत केली आहे. अर्थसंकल्प चर्चेसाठी त्यांना सभापती राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत बोलण्याची संधी दिली.
यावेळी ते म्हणाले, जगप्रसिद्ध रांजणखळगे हा राज्याचा अनमोल ठेवा आहे. हे पर्यटन क्षेत्र जगात नावलौकिकास पात्र ठरले आहे. या ठिकाणी विकासकामे मोठ्या प्रमाणात झाल्यास पर्यटन माध्यमातून युवकांना व्यवसायाच्या दृष्टीने रोजगार निर्मिती होईल. यासाठी ग्रामस्थांनी २५० कोटीचा विकास आराखडा तयार केला आहे.
हा आराखडा राज्य सरकारने मंजूर करावा अशी मागणी आमदार दाते यांनी केली आहे. तसेच तालुक्यातील सिद्धेश्वर व दर्याबाई हा परिसर निसर्गरम्य आहे. पर्यटन माध्यमातून या ठिकाणी विकासकामे झाल्यास याचा फायदा तालुक्यातील जनतेला तसेच राज्याला मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. यासाठी पर्यटन निधी मोठ्या प्रमाणात मिळण्याची गरज आहे. तसेच गोदावरी खोरे विकास प्रकल्पाचा फायदा पारनेर तालुक्यातील गावांना मिळण्यासाठी यासाठी सुद्धा मोठ्या निधीची आवश्यकता आहे.
आमदार दाते यांचे कौतुक
नगर-पारनेर मतदारसंघातील रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्याची मागणी केली. आ. दाते यांचे विधानसभेतील भाषन सोशल मिडिया माध्यमातून जनतेने पाहिल्याने विधानसभा विकासासाठी लढणारे एक सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून आमदार दाते यांचे कौतुक होत आहे.
राज्याचा अर्थसंकल्प जनतेसाठी लाभदायक
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक चांगला अर्थसंकल्प मांडला असून तो राज्यातील जनतेसाठी लाभदायक आहे. अर्थसंकल्पात लाडक्या बहिणीसाठी मोठ्या प्रमाणात तरतूद केली आहे. जनता व विकास यांचा समन्वय ठेवून या वर्षीचा अर्थसंकल्प जनविकासासाठी सर्वोत्तम आहे. राज्याचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री मंडळातील सदस्यांनी विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न केले आहेत.
– काशिनाथ दाते, आमदार, नगर- पारनेर मतदारसंघ