spot_img
अहमदनगरस्वकीयांकडून विश्वासघात होऊनही जगतापांनी विखेंना तारले!

स्वकीयांकडून विश्वासघात होऊनही जगतापांनी विखेंना तारले!

spot_img

अभय आगरकर, दिलीप सातपुते, बाबा वाकळे, सचिन जाधव आदींची अदृष्य शक्ती नीलेश लंके यांच्या पाठीशी | मोदींचे नगरमधील मुस्लिम विरोधी भाषणही नडले
सारिपाट / शिवाजी शिर्के
लोकसभा निवडणुकीत नगर शहरातून भाजपा उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना जवळपास ३२ हजारांचे मताधिक्य मिळाले. नगर शहरातून सुजय विखे यांना किमान पन्नास हजारांचे मताधिक्य गृहीत धरण्यात आले होते. मुंकुदनगर, झेंडीगेट या मुस्लिम बहुल भागातून सुजय विखे यांच्यापेक्षा नीलेश लंके यांना दहा हजारांपेक्षा जास्त मते मिळाली. याशिवाय दलित, आदिवासी आणि ख्रिश्चन या अल्पसंख्यांक समाजात घटना बदलण्याची भिती निर्माण झाली. त्याचाही परिणाम झाला. विखे यांच्या प्रचारार्थ नगरमध्ये नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. यासभेत मोदींनी जाहीरपणे मुस्लिमांच्या विरोधात भाष्य केले आणि त्यातून चवताळलेल्या नगर शहरातील मुस्लिम बांधवांनी लंके यांच्या पारड्यात एकगठ्ठा मतदान टाकले. मुकुंदनगर परिसरातील मुस्लिम बहुल १५ मतदान केंद्रांमध्ये विखे यांना दोन आकडी मते मिळून त्याची बेरीज ८९४ इतकी झाली तर नीलेश लंके यांना ९ हजार ८९ इतकी मते मिळाली. अर्थातच या भागातून लंके यांना ८ हजारांपेक्षा जास्तीचे मते मिळाली आणि तीच मते निर्णायक ठरली. याशिवाय भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, शिंदे गट शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, भाजपाकडून नगर लोकसभा मतदारसंघासाठी प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेले माजी महापौर बाबासाहेब वाकळे, शिंदे गटाचे सेनेचे संपर्कप्रमुख सचिन जाधव यांच्यासह भाजपातील नाराज गटाने (भैय्या गंधे यांचा अपवाद) ‘गपगार’ पडून घेत आपली अदृष्य शक्ती नीलेश लंके यांच्या पाठीशी उभी केल्याचे आकडेवारीवरुन समोर येत आहे.

नरेंद्र मोदींचे मुस्लिम विरोधी भाषण विखेंना भोवले!
नगरच्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिमांच्या विरोधात जाहीर भाषण केले. त्यातून मुस्लिम समाजात असुरक्षीततेची भावना निर्माण झाली. नगर लोकसभा मतदारसंघात एकूण मतदारांपैकी जवळपास १ लाख ७० हजार मते मुस्लिमांची आहेत. एकट्या नगर शहरात ४६ मते आहेत. त्याखालोखाल राहुरी तालुक्यात जवळपास ३० हजार, जामखेड आणि कर्जत तालुक्यात ३५ हजारांपेक्षा जास्त मते आहेत. इतर अन्य तालुक्यांमध्ये प्रत्येकी दहा- पंधरा हजारांच्या दरम्यान मुुस्लिम मते आहेत. पावणेदोन लाख अशी संख्या असणारा हा मतदार पहिल्यांदाच मतदानासाठी रांगेत उभा राहिला. मुुकंदनगरमधील ९० क्रमांकाच्या बुथवर विखे यांना ११ तर लंके यांना ९२३ मते मिळाली. ९३ क्रमांकाच्या बुथवर विखे यांना १२ तर लंके यांना ८२८ मते मिळाली. हे दोन बुथ प्रातिनिधीक आहेत. अशीच परिस्थिती अन्य बुथवर राहिली. एकूणच नगर मतदारसंघातील या समाजातील मतदान हे लंके यांच्या पारड्यात जाण्यात त्या समाजात भाजपाबद्दल आणि मोदींबद्दल असुरक्षीततेची भावना हेच कारण राहिले. मोदी यांचे हे असले भाषण नगरमध्ये झाले नसते तर मतांच्या आकडेवारीत नक्कीच फरक पडला असता.

आ. संग्राम जगताप यांना निवडणूक प्रक्रियेत टाळले असते तर…!
महायुतीतील अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांना सोबत घेण्याचा निर्णय सुजय विखे पाटील यांनी घेतला. वास्तविक पाहता जगताप यांना टाळून आम्हाला प्रक्रियेत घ्या असा आग्रह भाजपातील एका गटाचा होता. मात्र, भाजपातील सर्व गट- तट, शिंदे सेना आणि आ. जगताप अशा सर्वांना सोबत घेत सुजय विखे यांनी निवडणूक केली. मात्र, जगताप यांना झुकते माप दिले गेल्याचा कांगावा शेवटपर्यंत भाजपातील एका गटाने केला. त्यातूनच या सार्‍यांनी शेवटच्या आठवड्यात निवडणूक प्रक्रियेतून अलिप्त राहणे पसंत केले. नगर शहरातून विखेंना बत्तीस हजारांचे मताधिक्य मिळाले असले तरी ते याहीपेक्षा जास्त हवे होते. भाजपा आणि शिंदे गटातील कथीत नेत्यांच्या मागणीनुसार जगताप व त्यांच्या समर्थकांना डावलून निवडणूक केली असती तर…! जगताप- कर्डिले- कोतकर यांच्यावर नगरची जनता नाराज आहे आणि त्यांच्याच हातात निवडणूक दिल्याने त्याचा फटका नगरमधील मताधिक्यात बसल्याचे भाजपातील एका गटाकडून सांगितले जाते. मात्र, प्रभागनिहाय झालेले मतदान आणि विखे- लंके यांना मिळालेल्या मतदानाच्या आकडेवारीवर नजर मारली तर त्या आकडेवारीचे क्रेडीट भाजपाचा हा गट किंवा शिंदे गट घेऊ शकत नाही. कारण, यातील काही पदाधिकार्‍यांचे बंधू, मुुलगा, कुटुंब असे सारेच लंके यांच्या प्रचारात सक्रिय होते.

भिंगारमध्ये दलित- ख्रिश्चनांसह मुस्लिम बांधवांच्या असुरक्षीत भावनेतील मते लंके यांच्या पथ्य्यावर!
नगर शहराच्या लगत असणार्‍या भिंगार छावणी मंडळातून महाविकास आघाडीचे निलेश लंके यांना ३ हजार ४२३ मते मिळाली तर सुजय विखे यांना ५ हजार २७२ मते मिळाली. म्हणजेच विखे यांना १ हजार ८४९ इतकी जास्तीची मते मिळाली. छावणी मंडळ कार्यक्षेत्रात दलितांसह ख्रिश्चन, मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात आहेत. यातील दलितांसह ख्रिश्चन बांधवांमध्ये भाजपाकडून घटनेची मोडतोड केली जाण्याची भिती निर्माण झाली होती. त्याचा परिणाम नक्कीच झाला. याशिवाय मुस्लिम बांधवांमधील असुरक्षीततेच्या भावनेने त्यात भर टाकली. येथील १४४ आणि १५३ या दोन मतदान केंद्रात विखे यांना अनुक्रमे ११७ आणि १२२ मते मिळाली तर लंके यांना अनुक्रमे ५१९ आणि ४३३ मते मिळाली. एकूणच नकारात्मक आणि असुरक्षीत भावनेतून निर्माण झालेली अशी सारी मते नीलेश लंके यांच्या पथ्य्यावर पडली.

प्रभाग एक आणि दोनमध्ये दगाफटका होऊनही पावणेआठ हजारांचे मताधिक्य
सावेडी उपनगरातील संपत बारस्कर, शिवाजी चव्हाण, सागर बोरुडे, बाळासाहेब बारस्कर या राष्ट्रवादी नगरसेवकांच्या प्रभाग एकमध्ये सुजय विखे यांना ७२७७ मते मिळाली तर नीलेश लंके यांना ३६५८ मते मिळाली. येथून विखे यांना ३ हजार ६१९ जास्तीचे मते मिळाली. दोन क्रमांकाच्या प्रभागात निखील वारे, विनीत पाऊलबुद्धे, बाळासाहेब पवार, सुनील त्र्यंबके हे राष्ट्रवादी नगरसेवक आहेत. या प्रभागात विखे यांना ८ हजार ३२ तर लंके यांना ३ हजार ९०५ म्हणजेच विखे यांना ४ हजार १२७ जास्तीची मते मिळाली. अर्थात या दोन्ही प्रभागात उच्चभ्रू, उच्च शिक्षीत मतदार आहेच! याशिवाय भाजपाला माननारा मतदारही आहेच.

मुंकुंदनगरमधून लंके यांना गठ्ठा मतदानाने गणित फिरवले!
मतमोजणी चालू असताना सातव्या फेरीपर्यंत विखे आघाडीवर होते. मात्र, आठव्या फेरीत नगर शहरातील प्रभाग क्रमांक तीनमधील मुकुंदनगरची मोजणी सुरू झाली आणि त्यात लंके यांना ९ हजार ८९ तर विखे यांना अवघी ८९४ मते मिळाली. तब्बल ८ हजार १९५ इतकी मोठी आघाडी मुकुंदनगरमधून मिळाल्यानंतर लंके यांचे मताधिक्य शेवटपर्यंत वाढतच गेले. मुुस्लिम मतदारांमध्ये निर्माण झालेली असुरक्षीततेची भावनाच या महत्वाची आणि निर्णायक ठरली आणि संपूर्ण निकालाचे गणितच येथे बदलून टाकले गेले.

पावणेनऊ हजारांचे मताधिक्य देत अजिंक्य बोरकर, भैय्या गंधे यांनी दाखवला करिष्मा!
उपनगरातील अजिंक्य बोरकर, अमोल गाडे (दोघेही राष्ट्रवादी), योगीराज गाडे (उबाठा सेना) आणि स्वप्नील शिंदे (भाजपा, सध्या तुरुंगात) या चौघांच्या प्रभाग क्रमांक चारमधून लंके यांना ४ हजार १५ तर विखे यांना ६ हजार ७९६ मते मिळाली. येथून विखे यांना २ हजार ७८१ चे मताधिक्य मिळाले. प्रभाग पाच मधून तायगा शिंदे, भैय्या गंधे, मनोज दुुुल्लम, आशाताई कराळे हे भाजपा नगरसेवक आहेत. या प्रभागात विखे यांना ९ हजार १७३ आणि लंके यांना ३ हजार ९९ मते मिळाली. येथून विखे यांना ६ हजार ७४ जास्तीचे मते मिळाली.

बाबासाहेब वाकळेनी गडबड करुनही विखेंना अडीच हजारांपेक्षा जास्तीचे मताधिक्य!
भाजपाने ज्यांच्यावर या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली होती असे माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या प्रभागात त्यांच्याच बंधूने (किशोर वाकळे) जाहीरपणे नीलेश लंके यांच्या तुतारीचा प्रचार केला आणि मतदान घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. या प्रभागात वाकळे यांच्यासह बारस्कर, ताठे आणि जाधव असे चारही नगरसेवक भाजपाचे आहेत. मात्र, असे असतानाही सावेडी गावठण परिसरातील या प्रभाग सहामध्ये अवघे २ हजार ५९० इतकी जास्तीचे मते मिळाली.

बोल्हेगावमध्ये कुमार वाकळे यांनी खिंड लढवली!
बोल्हेगाव व परिसर असणार्‍या प्रभाग सातमध्ये दत्तापाटील सप्रे, अशोक बढे, भाकरे असे तीन नगरसेवक हे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे! कुमार वाकळे हे एकमेव नगरसेवक येथून राष्ट्रवादीचे आहेत. सेनेच्या तीनही नगरसेवकांनी लंके यांच्यासाठी ताकद लावल्याने त्यांना या प्रभागात ४ हजार ४६६ मते मिळाली तर विखे यांना ७ हजार ३९ मते मिळाली. कुमार वाकळे यांनी एकट्याने येथे खिंड लढवली आणि त्यांनी विखे यांना २ हजार ७७३ जास्तीची मते मिळवून दिली.

भैय्या परदेशीच्या प्रभागातही कमळ फुलले, तरीही ते नाचले लंके यांच्या मिरवणुकीत!
नालेगाव परिसरातील प्रभाग आठ हा महापौर शेंडगे यांच्यासह माजी उपमहापौर अनिल बोरुडे, सचिन शिंदे, अप्पा नळकांडे या उबाठा सेनेच्या नगरसेवकांचा! यात विखे यांना ५ हजार २८२ मते तर लंके यांना २ हजार ६७२ मते मिळाली. येथून २ हजार ६१० अधिकची मते विखे यांना मिळाली. प्रभाग नऊमध्ये भाजपा नगरसेवक प्रदीप परदेशी व ढोणे हे दोघे भाजपाचे! धनंजय जाधव विखेंचे तर दीप चव्हाण काँग्रेसचे! तोफखाना, सिद्धार्थनगर, दिल्लीगेट असा साधारण परिसर यात येतो. या प्रभागात विखे यांना ३ हजार ७४० जास्तीची मते मिळाली. भैय्या परदेशी हे विखे यांचे पोलिंग एजंट आणि मतमोजणी प्रतिनिधी! मात्र, लंके यांना विजयी घोषीत केल्यानंतर झालेल्या विजयी मिरवणुकीत परदेशी यांना गुलाल घेतला आणि आनंद व्यक्त करत ते नाचले!

कोठला, झेंडीगेट, सर्जेपुरा, कोठीत लंके यांची तुतारीच!
कोठला, सर्जेपुरा, मंगलगेट, लालटाकी, ग्राहक भांडार असा दहा क्रमांकाचा प्रभाग. या प्रभागात सचिन जाधव हे शिंदे सेनेचे नगरसेवक! मात्र, ते मतदान झाले तरी नॉटरिचेबल राहिले. येथील मुदस्सर शेख, भाऊसाहेब उनवणे, जसपाल पंजाबी यांनी थेटपणे लंके यांच्यासाठी भूमिका घेतली. या प्रभागात मुुस्लिम मतदार देखील मोठ्या प्रमाणात आहेतच! या प्रभागातून लंके यांना ५ हजार २८६ तर विखे यांना ४ हजार ३०३ मते मिळाली. अर्थातच लंके यांना ९८३ जास्तीचे मते मिळाली. प्रभाग ११ मध्ये झेंडीगेट, कोठी, हातमपुरा, गुलाबसिंग कंपाऊंड असा परिसर येतो आणि या प्रभागात अविनाश घुले, भा. कुरेशी, नज्जू पहिलवान, रुपाली परागे हे राष्ट्रवदी नगरसेवक आहेत. मुुस्लिम आणि ख्रिश्चन बांधवांचे प्राबल्य येथे आहे. या प्रभागात लंके यांना ५ हजार ७३७ तर विखे यांना ४ हजार २६३ मते मिळून लंके यांना १ हजार ४७४ जास्तीचे मते मिळाली.

संभाजी कदम, बोराटे यांच्या माळीवाड्यात लंके पिछाडीवर!
शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे आणि सौ. लोखंडे या उबाठा सेनेच्या नगरसेवकांच्या बारा क्रमांकाच्या प्रभागात दत्ता कावरे हे एकमेव भाजपा नगरसेवक! येथे लंके यांना ४ हजार ५२८ तर विखे यांना ५ हजार ५२३ मते मिळून विखे यांना ९९५ जास्तीचे मते मिळाली. प्रभाग १३ मध्ये नालेगाव, टिळक रोड, झारेकर गल्ली, जुने कोर्ट, आनंदीबाजार, दिल्लीगेटचा काही भाग असा परिसर येतो. येथून शिंदे गटाचे सुभाष लोंढे, भाजपाचे अजय चितळे, उबाठा गटाचे गणेश कवडे, संतोष ग्यानप्पा हे नगरसेवक आहेत. या प्रभागात लंके यांना १ हजार ४५२ तर विखे यांना ३ हजार ९६५ मते मिळून विखे यांना २ हजार ५१३ जास्तीचे मते मिळाली.

भगवान फुलसौंदर यांच्या प्रभागात कमळच फुलले; अनिल शिंदे यांची विखेंना भक्कम साथ!
माजी महापौर भगवान फुलसौंदर हे नीलेश लंके यांच्यासाठी प्रामाणिक भूमिका घेऊन राहिले. मात्र, त्यांच्या १४ क्रमांकाच्या प्रभागात विखे यांना २ हजार ८३५ इतकी जास्तीची मते मिळाली. गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, सौ. शितल जगताप हे राष्ट्रवादीचे नगरसेवक येथे आहेत. आ. संग्राम जगताप यांच्या सौभाग्यवती येथे नगरसेविका आहेत. येथे नीलेश लंके यांना ३ हजार २३ मते मिळाली तर विखे यांना ५ हजार ८५७ मते मिळाली. एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी त्यांच्या प्रभाग १५ मध्ये विखे यांच्यासाठी ताकद लावली. दत्ता जाधव, दिपक खैरे, प्रशांत गायकवाड हे उबाठा गटाचे तीन नगरसेवक येथे असताना अनिल शिंदे यांनी प्रामाणिक भूमिका घेत विखे यांना १ हजार ९४१ जास्तीची मते दिली. येथे लंके यांना २ हजार ७४० तर विखे यांना ४ हजार ६८१ मते मिळाली.

ओंकारच्या आडून खेळला दिलीत सातपुतेंनी डाव!
मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत वरकरणी विखेंसोबत असल्याचे आणि त्यांनाच मताधिक्य मिळेल अशा मथळ्याच्या बातम्या छापून आपण महायुतीचा धर्म पाळत असल्याचे शिंदे गटाच्या दिलीप सातपुते यांनी दाखवले. मात्र, प्रत्यक्षात तसे नव्हते. त्यांचे आप्तस्वकीय, कुटुंब आणि खास करुन त्यांचे चिरंजीव ओंकार सातपुते यांनी निलेश लंके यांच्यासाठी जाहीर भूमिका घेतली. लंके यांच्या विजयी मिरवणुकीत गुलालात माखून निघालेल्या ओंकार सातपुते याला पाहताच दिलीप सातपुते यांच्याबद्दलच्या शंकांना बळकटी मिळाली. मात्र, इतके सारे केल्यानंतरही केडगावमधून विखे यांना चार हजारांपेक्षा जास्तीचे मताधिक्य मिळाल्याने सातपुते यांच्या भूमिकेला केडगावमधूनच छेद बसल्याचे स्पष्टपणे समोर आले.

सातपुते विरोधात जाऊनही केडगाव उपनगरात विखेंना चार हजारांचे मताधिक्य!
केडगाव उपनगरात कोतकर यांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, हे वर्चस्व मोडीत काढत आपणच आता नगर शहराचा आमदार असल्यागत शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी भूमिका घेतली. त्यांच्याच स्वत:च्या होमग्राऊंड समजल्या जाणार्‍या केडगावकरांनी सातपुते यांच्या दुटप्पी भूमिकेला छेद देण्याचे काम केले. केडगावमधील १६ प्रभागमधून लंके आणि विखे यांना अनुक्रमे ६ हजार ९७ आणि ८ हजार ७२३ इतकी मते मिळाली. या प्रभागात विखे यांना २ हजार ६२६ जास्तीचे मते मिळाली. या प्रभागात उबाठा सेनेचे अमोल येवले, विजय पठारे, कोतकर आणि शिंदे हे चारही नगरसेवक असले तरी ते दिलीप सातपुते यांचे समर्थक आहेत. प्रभाग १७ मध्ये चारही नगरसेवक म्हणजेच मनोज कोतकर, लता शेळके, गणेश नन्नवरे आणि कांबळे हे भाजपाचे आहेत. या प्रभागात दिलीप सातपुते हे पराभूत झालेले आहेत. त्यांचा वरचष्मा असतानाही येथे विखे यांना ३ हजार ५५४ तर लंके यांना २ हजार २६९ मते मिळून विखे यांना १ हजार ४४५ जास्तीची मते मिळाली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्करांच्या घरी राडा? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...