पारनेर / नगर सह्याद्री-
पारनेर, सुपा परिसरातील सुमारे चारशे कोटी रूपयांना गंडा घालणाऱ्या ‘सिस्पे कंपनी’ वर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पारनेर, सुपा, श्रीगोंदा येथील ठेवीदारांनी सुपा सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या कडे केली आहे. याबाबत सर्व ठेवीदारांनी एकत्र येऊन दिवटे यांना शुक्रवार दि. १८ रोजी सकाळी ११ वाजता निवेदन दिले.
सततच्या भुलथापांना कंटाळून ‘सिस्पे कंपनी’ विरोधात ठेवीदार आक्रमक झाले असून शुक्रवारी रोजी संबंधित एजंटला घरी जाऊन जाब विचारला. आम्ही आहोत अशी आश्वासने देण्याचे काम येथील कंपनीच्या एजंटाच्या घरच्यांनी केले आहे. गुंतवणुकदार पैसे मागण्यासाठी चकरा मारत आहेत. मात्र, आता पंधरा दिवसांपासून कार्यालयच बंद झाल्याने अनेक जण याबाबत तक्रार दाखल करण्याच्या तयारीत आहेत.
दरम्यान सुपा येथीलच मनिमॅक्स नावाची कंपनी आली त्याही कंपनीने १२ ते १८ टक्के परताव्याचे अमिष दाखविले काही दिवस परतावाही दिला. मात्र, सुमारे सहा महिण्यांपुर्वी ही कंपनीसुद्धा गायब झाली याही कंपनीत सुपा व परीसरातील लाखो रूपये गुंतवणुकदारांचे बुडाले आहेत. यातील कंपनीच्या संचालकांवर गुन्हाही दाखल झाला आहे.
याला काही महीने होत नाहीत तोच आता सुपा व परीसरातील गुंतवणुकदारांचे प्रथम सिस्पे नंतर ‘झेस्ट’ या नावाची शेअर्समध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली व १० ते १२ टक्के परतावा देण्याचे अमिष दाखवून लाखो रूपये जमा केले व आता याही ठिकाणी गुंतवणुकदारांचे काही दिवसापासून पैसे परत मिळेनासे झाले आहेत. कंपनीचे काम सुरू आहे. कंपनीचे नाव बदलले आहे. परकीय चलनात आपले शेअर्स बदलले जात आहेत, सॉफ्टवेअर दुरूस्ती सुरू आहे, अशी कारणे सांगत गुंतवणुकदारांना काही दिवस झुलवत ठेवले जात आहे. आता मात्र कंपनीचे कार्यालय गेली पंधरा ते सोळा दिवसांपासून बंद झाल्याने आता पैसे मिळणार नाहीत अशी खात्री गुंतवणुकदारांची झाली आहे.
सिस्पे मध्ये पैसे जमा करण्याचे प्रलोभन देणारे गावातीलच स्थानिक एजंट होते. त्यामुळे त्यांच्यावर अनेकांनी विश्वास ठेवला. एजंटांनी आपले मित्र जवळचे नातेवाईक यांचेच पैसे गुंतवणुकीसाठी घेतले. त्यांना प्रथम काही दिवस चांगला परतावा ही दिला होता. आता मात्र पैसे मिळत नसल्याने सर्वजण हताश झाले आहेत. पैसे मित्राच्या किंवा नातेवाईकांच्यामार्फत गुंतवल्याने अनेकांची तक्रार करण्याची अडचनही झाली आहे.
अनेकांनी कर्ज काढून तर काहींनी आपली सेवानिवृत्तीची पुंजी यात गुंतविल्याची चर्चा सुरू आहे. सुपा परीसरात नव्याने एमआयडीसी झाल्याने त्या ठिकाणी ज्यांच्या जमिनी गेल्या होत्या त्यांना जमिनीचे पैसे मिळाले होते. त्यांनी ते पैसे यात गुंतविले आहेत. त्यामुळे आता जमीनही गेली व पैसेही गेले अशी काहींची अवस्था झाली आहे. तर काहींनी आपल्या आयुष्याची पूंजी त्यात गुंतवली आहे.
दरम्यान कंपनीने दिलेल्या आश्वासनांची ५ दिवसात पूर्तता न केल्यास कंपनी डायरेक्टर, फंड मॅनेजर व सर्व पार्टनर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.