Crime News : खर्चासाठी पैसे न दिल्याने अल्पवयीन मुलाने आपल्या आईचा गळा घोटून हत्या केली. गोंदिया तालुयातील दासगाव येथील भारती सहारे (४४) यांच्या मृत्यूचा अखेर उलगडा झाला आहे. खर्चासाठी पैसे न दिल्याने मुलानेच गळा दाबून व डोके जमिनीवर आपटून आईचा जीव घेतल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तिच्या १७ वर्षीय मुलावर रावणवाडी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भारती सहारे गोंदिया तालुक्यातील दासगाव येथे आपल्या 17 वर्षीय मुलासोबत राहत होत्या. पतीच्या निधनानंतर गावातच अंडी विकून त्या आपला उदरनिर्वाह करायच्या. भारती यांना त्यांचा मुलगा नेहमीच खर्चासाठी पैसे मागत मागायचा. 26 जूनच्या रात्रीही असेच या अल्पवयीन मुलाने आपल्या आईला खर्चासाठी पैसे मागितले. पण यावरून पुढे दोघांत वाद झाला.
माय-लेकांमध्ये झालेला हा वाद नंतर वाढत घेला. याच वादात रागाच्या भरात अल्पवयीन मुलाने आपल्या आईचा गळा आवळून डोके जमिनीवर आपटले. यामुळे डोक्यात अंतर्गत रक्तस्त्राव झाला व मेंदूत रक्त गोठून संबंधित महिलेचा मृत्यू झाला. नंतर त्या अल्पवयीन मुलाने नातेवाईकांना आईच्या मृत्यू नैसर्गिक झाला असे सांगून अंत्यसंस्कार केले.
मात्र, संशय आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला. या तपासाअंतर्गत पोलिसांनी मृत महिलेचा पुरलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढले. त्यानंतर या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या संपूर्ण तपासानंतर मृत महिलेच्या खुनाचा उलगडा झाला. अल्पवयीन मुलाचे बिंग फुटले. सर्व प्रकरण समोर आल्यानंतर रावणवाडी पोलिसांनी 17 वर्षीय विधी संघर्षीत मुलावर भारतीय न्याय संहिता कलम 103 (1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.