अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघाच्या कापड बाजार अहिल्यानगरच्या मालकीच्या स्टेशन रोड येथील हुंडेकरी चाळ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जागेत मंदीराबाबत दिलेल्या खोट्या तक्रारीची चौकशी होऊन अध्यक्ष व ट्रस्टी यांची बदनामी केल्याप्रकरणी शिवसेना शहर प्रमुख किरण काळे व मनोज गुंदेचा यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली.
यावेळी मुख्य ट्रस्टी सुभाष मुथ्था, राजेंद्र शहा, लालचंदजी कासवा, जितेंद्र गांधी, किशोर भंडारी, विनोद शहा, दिनेश पटवा, दिपक शहा, संदीप शहा, राजेंद्र बोथरा, संतोष बोरा यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. निवेदनात म्हटले की, श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघाची स्टेशन रोड येथे हुंडेकरी चाळ या नावाने ओळखली जाणारी जागा ट्रस्ट च्या मालकीची आहे. सदर जागा ट्रस्टला दि.20 जानेवारी 1975 रोजी बक्षीसपत्राने मिळाली असुन तेंव्हापासून या जागेत भाडेकरुचा ताबा आहे. सदर बक्षीस पत्रामध्ये जैन मंदीर असल्याबाबत किंवा कुठलेही मंदीर असल्याबाबत उल्लेख नाही.
सदरहु जागेत पूवपासूनच भाडेकरू असल्यामुळे तिथे कधीही साधु भगवंताचे वास्तव्य नव्हते किंवा जाहीर प्रवचनाचे कार्यक्रमही झाले नाही व या जागेत कधीही मंदीर अस्तित्वात नव्हते अशी खरी वस्तुस्थिती असतांना जाणुन-बुजून दुष्ट हेतुने ट्रस्टला व ट्रस्टीला बदनाम करण्यासाठी व खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी त्या ठिकाणी मंदीर होते असे भासवुन तसा खोटा तक्रारी अर्ज उबाठाचे किरण काळे व मनोज गुंदेचा यांनी कोतवाली पोलीस स्टेशन या ठिकाणी दिला आहे याची सखोल चौकशी होऊन अर्जदाराविरुध्द खोटा व दिशाभुल करणारा तक्रारी अर्ज दिल्याबद्दल त्यांचे विरुध्द कायदेशीर कार्यवाही करावी. सदर जागा आम्ही कोणासही साठेखत किंवा खरेदीखताने दिलेली नसून ती आजही संस्थेच्याच मालकीची आहे असे निवेदनात म्हंटले आहे.

जैन मंदिर: काळे यांचे पुण्यात धरणे आंदोलन; ताबा न सोडल्यास प्राणांतिक उपोषण करणार
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगरमध्ये श्री ऋषभ संभव जीन जैन श्वेतांबर संघ (जैन मंदिर) ट्रस्टचा भूखंड हडप करत मंदिर, प्रवचन स्थळ पाडून त्या ठिकाणी राजकीय पक्षाचे कार्यालय थाटल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी केला आहे. या प्रकरणात तक्रार करूनही कोणतीही कारवाई न झाल्यामुळे काळे यांनी पुण्यात सह धर्मदाय आयुक्त कार्यालयासमोर बुधवारी एक दिवसीय धरणे आंदोलन केले.
याबाबतचे अनेक कायदेशीर पुरावे, मनपाचे दस्तऐवज त्यांनी माध्यमांद्वारे समाजा समोर आणले. खासदार सुप्रिया सुळे, खासदार नीलेश लंके, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील काळे यांच्या कारवाईच्या मागणीचे समर्थन केले आहे. हडप केलेला संपूर्ण भूखंड खाली करून तो तत्काळ ट्रस्टला हस्तांतरित करावा, या कारवाई साठी विशेष व्यक्तीची नेमणूक करावी, ट्रस्टने धर्मदायीची कोणतीही पूर्व परवानगी न घेता, तसेच देणगीदाराच्या मृत्युपत्रातील अटी शतचे उल्लंघन करून बेकायदेशीररीत्या संबंधित जागेत भाडेकरू ठेवला आहे.
याप्रकरणी सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशा मागण्या आंदोलनावेळी काळे यांनी केल्या. यावेळी जागेचा ताबा ट्रस्टला देण्याची कारवाई झाली नाही तर आंदोलन तीव्र केले जाईल. वेळप्रसंगी प्राणांतिक उपोषण करण्याचा इशारा काळे यांनी दिला आहे.
धमकावल्याचा आरोप
किरण काळे यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. काळे म्हणाले, पुण्याच्या प्रकरणावरून अहिल्यानगरमध्ये मोर्चा निघाला. मात्र अहिल्यानगरमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. काही समाज बांधवांनी या विषयाबाबत बैठक घेतली. मात्र त्याची माहिती समजताच लोकप्रतिनिधींनी त्यांना धमकावले. आर्थिकदृष्ट्या श्रीमंत असणाऱ्या मात्र स्वभावाने गरीब असणाऱ्या, व्यापारी समाजाचा आवाज सत्ता, दहशतीच्या जोरावर दाबला जात असल्याचे काळे म्हणाले.



