अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने दीप चव्हाण यांची पुन्हा एकदा अहिल्यानगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीने स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
दीप चव्हाण यांनी आपल्या नियुक्तीसाठी खा. राहुल गांधी, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले आहेत.
पक्षाच्या तत्त्वांशी निष्ठावान राहून, संघटन बळकट करणे आणि जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करणे हे माझे प्रमुख ध्येय राहील. काँग्रेस पक्षाची मूल्यव्यवस्था प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध आहे. अशी प्रतिक्रिया नियुक्तीनंतर दीप चव्हाण यांनी दिली.
शहरात काँग्रेस पक्षाचा मजबूत प्रभाव निर्माण करण्यासाठी युवा नेतृत्व, महिला, शेतकरी, कामगार व सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन सक्रिय भूमिका बजावण्याचा त्यांनी संकल्प व्यक्त केला. नियुक्तीनंतर सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.