२३ तक्रारी मान्य, ६९ हरकती फेटाळल्या / १८ ऑगस्टला अंतिम प्रभाग रचना होणार जाहीर
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत २१ जुलैपर्यंत ९२ हरकती दाखल झाल्या होत्या. दाखल हरकतींवरील सुनावणी पूर्ण झाली असून, नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी ६९ हरकती फेटाळल्या, तर २३ हरकती मान्य केल्या आहेत, अशी माहिती जिल्हा ग्रामपंचायत विभागाने दिली आहे. नाशिक विभागीय आयुक्तांनी ९२ हरकतींपैकी जामखेड, पारनेर, कोपरगाव आणि श्रीगोंदा तालुयांमधील २३ हरकती मान्य केल्या असून, उर्वरित ६९ हरकती फेटाळण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणाच्या रचनेवर ९२ हरकती दाखल झाल्या होत्या. त्यापैकी जामखेड तालुयातील ४४ हरकतींचा समावेश होता, तर पारनेरमध्ये १५, अकोले १०, नगर ८, संगमनेर ५, कर्जत ४, कोपरगाव आणि राहाता प्रत्येकी ३, श्रीगोंदा, जिल्हाधिकारी कार्यालय, शेवगाव आणि राहुरी तालुयात प्रत्येकी १, अशा हरकती नोंदवल्या गेल्या होत्या. नेवासा, श्रीरामपूर आणि पाथर्डी तालुयात कोणतीही हरकत दाखल नव्हती.
दाखल झालेल्या हरकती गट व गणातून गाव वगळणे किंवा समावेश करण्यासंबंधीच्या होत्या. १४ जुलै रोजी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण याच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर केला होता. यावर २१ जुलैपर्यंत हरकती आणि सूचना देण्याची अंतिम मुदत ठेवण्यात आली होती. प्रारूप प्रभाग रचनेत जिल्हा परिषदेचे ७५ गट आणि पंचायत समितीचे १५० गणांमध्ये समाविष्ट गावांची नावे आणि नकाशा जाहीर करण्यात आले होते. ही रचना २०११ च्या लोकसंख्येच्या आधारावर झेड पद्धतीने तयार करण्यात आली आहे.
अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून
१८ ऑगस्टला जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा गट-गणांची अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार असल्याने लवकरच निवडणुकांचा धुरळा उडण्यास सुरुवात होणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अनेकांनी मैदान पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक जवळ आल्याने गावागावात अनेक पुढारी दिसू लागली आहेत. निवडणुकीसाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असल्याचे बोलले जात आहे.