मुंबई / नगर सह्याद्री –
Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील हफ्ता कधी येणार? याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील गरजू महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत महायुती सरकारने राज्यातील महिलांना दरमहा १५०० रुपये देण्याची घोषणा केली होती.
दिवाळी आणि निवडणुकीच्या वेळी लाडक्या बहिणींना एकत्र २ हफ्ते म्हणजे, ३००० रुपये देण्यात आले होते. त्यानंतर ही रक्कम २१०० पर्यंत वाढणार असल्याचं म्हटलं गेलं होतं. आता महिलांना पुढील हफ्ता १५०० चा मिळणार की ३००० रुपयांचा? जाणून घ्या.
लाडक्या बहिणींना अजूनही लाडक्या डिसेंबर महिन्याचा हफ्ता मिळालेला नाही. दरम्यान अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी महत्वाची अपडेट दिली आहे. लाडकी बहीण योजना सुरुच राहिल आणि सध्या निकष बदलणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे कुठलेही व्हिडिओ, मेसेच तुमच्याकडे आले, तर त्यावर विश्वास ठेवू नका, असं त्यांनी म्हटलंय.
लाडकी बहीण योजनेचा पुढील हफ्ता येत्या २३ डिसेंबरला अकाऊंटमध्ये जमा होईल, असं म्हटलं जात आहे. ही तारीख समोर आल्यानंतर आता पैसे खात्यात केव्हा येणार याची वाट पाहिली जात आहे.
पुढचा हफ्ता १५०० चा असेल की २१०० चा याबाबत अजूनपर्यंत कुठलीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये अजूनही संभ्रम कायम आहे. पुढील हफ्ता हा १५०० चा येणार असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
तर अकाऊंटमध्ये २१०० रुपये येण्यासाठी लाडक्या बहिणींना आणखी वाट पाहावी लागू शकते, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. २१०० रुपये हफ्ता देण्यासाठी बजेटमध्ये तरतुद करावी लागेल. त्यामुळे हा निर्णय २०२५-२६ च्या बजेटमध्ये मांडला जाईल. त्यानंतर तो लागू केला जाऊ शकतो.