मुंबई / नगर सह्याद्री –
महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. या योजनेवरून विरोधक वारंवार सरकारवर टीका करत आहेत. अशामध्ये लाडकी बहीण योजनेवरून लाडक्या बहिणी भिडल्या आहेत. काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केली. याला महिला आणि बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांनी यांनी बेधडक प्रत्युत्तर दिले आहे.
प्रणिती शिंदे यांनी लाडकी बहिणी योजनेवर टीका करताना सांगितले की, ‘लाडकी बहीण ह्या निवडणुकींसाठी चुनावी जुमला होता. त्यांनी तो व्यवस्थित खेळला. लाडकी बहिणीमुळे महाराष्ट्र दिवाळखोर झाला आहे असा रिपोर्ट येत आहे. इतर योजनांचे पैसे थांबवले आहेत. तिजोऱ्या रिकाम्या पडल्या आहेत. लाडकी बहीण आतुरतेने वाट पाहत आहे तिला सावत्र करू नये.’
तर आदिती तटकरे यांनी प्रणिती शिंदे यांना प्रत्युत्तर दिले आहे. ‘सुरूवाती पासूनच विरोधकांना लाडकी बहीण योजनेची अॅलर्जी आहे. एका बाजुला १५०० रुपये दिले तर राज्य आर्थिक संकटात येईल म्हणतात आणि दुस-या बाजूला ३००० रुपये देण्याचे वक्तव्य करतात. हे बोलणं दुटप्पीपणाचं आहे.’ तसंच, ‘पुढच्या काळात लाडकी बहीण योजना अशीच चालू राहणार आणि महिलांना अधिक आर्थिक सक्षम करण्यासाठी आमचे प्रयत्न असतील.’, असं देखिल त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्रणिती शिंदे यांनी बीडमधील गुन्हेगारीवरू धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. प्रणिती शिंदे यांनी सांगितले की, ‘ धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाच पाहिजे. ते या प्रकरणात आहे हे पूर्णपणे दिसून येत आहे. काँग्रेसचे सरकार असताना वारंवार जेव्हा राजीनामे मागितले जायचे तेव्हा नैतिक जबाबदारी घेऊन ते दिले जायचे. त्यावेळी जरी ती लोक दोषी नसले तरीसुद्धा पब्लिक प्रेशरमुळे राजीनामे हे दिले जायचे. मात्र हे सरकार अतिशय निगरगठ्ठ आणि अहंकारी आहे. त्यामुळे हे लवकर हलतील असं दिसत नाहीये.’