मुंबई । नगर सहयाद्री:-
राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा गुरुवारी सायंकाळी 5 वाजता आझाद मैदानावर होणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार हे शपथ घेणार आहे. तर एकनाथ शिंदे हे देखील शपथविधी सोहळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे.
बुधवारी संध्याकाळी पार पडलेल्या महायुतीच्या पत्रकार परिषदेतही एकनाथ शिंदे यांनी आपला मंत्रिमंडळातील सहभाग निश्चित नसल्याचे संकेत दिले होते. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदासोबत गृहमंत्री मिळावे, यावर ठाम होते.
परंतु, त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. वर्षा बंगल्यावरील अँटी चेंबरमध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घ चर्चा झाली. त्यानंतर डिल फिक्स झाल्याची माहिती समोर आली आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना, तुमच्या मागण्यांबाबत भाजपकडून विचार केला जात असल्याचे सांगितले. तसेच या चर्चेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गृहमंत्रीपदाच्या मोबदल्यात महसूल हे महत्त्वाचे खाते सोडण्याची तयारी देवेंद्र फडणवीस यांनी दाखवल्याचे समजते.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तुम्ही मुख्यमंत्री असताना मी उपमुख्यमंत्रिपद भूषवलं. आपण एकत्र निवडणूक लढली. आपण अडीच वर्षे एकत्र काम केलं. तुमच्या मागण्या आमच्यासमोर आहेत. आम्ही त्यावर वरिष्ठांसोबत बोलून तोडगा काढू…वरिष्ठांकडून तुमच्या मागणीवर चर्चा केली जातेय. तीन पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली. त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये सामील व्हावं…शपथविधीला मी आणि फक्त अजित पवारांनी शपथ घेतल्यास ते योग्य दिसणार नाही. त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी, अशी विनंती देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांना केली.
महसूल खातं सोडणार?
सूत्रांच्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील बैठकीत गृहखात्याबाबत चर्चा झाली. परंतु, भाजप गृहखाते सोडायला तयार नाही. त्यानंतर ही चर्चा महसूल खात्यापर्यंत आली आणि भाजप महसूल खातं एकनाथ शिंदेंना देण्यास तयार आहे. याबाबत सकारात्मक चर्चा सुरु असल्याचे समजते. या सकारात्मक चर्चेंनंतर एकनाथ शिंदे यांनी मी तुमच्या सरकारमध्ये सहभागी होण्यास तयार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांना सांगितले, अशी माहिती समोर आली आहे.