अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घाणेगाव शिवारात दिवसाढवळ्या एका फार्महाऊसवर घुसून, तलवार आणि पिस्तुलाचा धाक दाखवत ९७ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी दि. १३ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी ज्ञानेश्वर उद्धव शिरसाठ (वय ४०, रा. कौठा, ता. नेवासा) यांचे घाणेगाव शिवारात फार्म हाऊस आहे.
सोमवारी दुपारी राहुल प्रकाश मांढरे, मनोज कराळे, ज्युनेद इनामदार आणि त्यांच्या सोबतच्या पाच अनोळखी महिलांनी फार्महाऊसमध्ये जबरदस्तीने प्रवेश केला.मॅनेजर मयूर जाधव यांच्या डोक्याला पिस्तुल लावून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांच्या खिशातील २ हजार २०० रुपये रोख व गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून नेली.
तसेच आरोपींनी फिर्यादी शिरसाठ यांच्या मानेला तलवार लावून धमकावले आणि त्यांना फार्महाऊसवरून हाकलून दिले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून राहुल मांढरेसह इतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक मोंढे तपास करत आहेत.