अहिल्यानगर/ नगर सह्याद्री –
शहरातील तपोवन रोडवरील कसबे वस्ती परिसरात एका सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंत्याच्या बंद फ्लॅटवर चोरट्यांनी दिवसाढवळ्या डल्ला मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुटुंब खरेदीसाठी बाहेर गेले असल्याची संधी साधत, चोरट्यांनी घराचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी बेडरूममधील कपाटाचे लॉकर तोडून त्यातील रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ३ लाख १४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
याप्रकरणी अविनाश जालिंदर गुंड (वय ३१) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अविनाश गुंड हे सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. दि. ०५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ते त्यांच्या कुटुंबासह कापडबाजार येथे खरेदीसाठी गेले होते. यावेळी त्यांनी फ्लॅटच्या दरवाजाला व्यवस्थित कुलूप लावले होते.
संध्याकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास गुंड कुटुंब खरेदी करून घरी परत आले. त्यावेळी त्यांना घराच्या दरवाजाचा कडी-कोंडा तुटलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी आत जाऊन पाहिले असता, बेडरूममधील कपाटातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते आणि लॉकर तुटलेले आढळून आले.
चोरी झाल्याचे लक्षात येताच अविनाश गुंड यांनी तात्काळ तोफखाना पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. अधिक तपासासाठी ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते.
चोरट्यांनी लॉकरमध्ये ठेवलेली २ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम, सुमारे ६० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन, सोन्याचे कानातील, सटवाई आणि चांदीचे पैंजण व जोडवी असा एकूण ३ लाख १४ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अविनाश गुंड यांच्या फिर्यादीवरून, तोफखाना पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. भरदिवसा झालेल्या या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.



