रायगड / नगर सह्याद्री :
रायगडमधील महाड गावामध्ये घडलेल्या विषबाधा प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी पनवेल सत्र न्यायालयाने निकाल दिला असून या प्रकरणातील आरोपी महिलेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रज्ञा उर्फ ज्योती सुरवसे असे आरोपी महिलेचे नाव आहे. चला तर मग जाणून घेऊया या प्रकरणाबद्दल…
काय आहे नेमके प्रकरण?
2018 साली महड गावातील एका घरात वास्तूशांती कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी या कार्यक्रमातील जेवणातून 86 जणांना विषबाधा झाली होती. जेवणात विषारी कीटकनाशक टाकल्याने ५ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तत्कालीन तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा तपास सुरू होता. या प्रकरणी आज कोर्टाने निकाल देऊन आरोपीला जन्मठेपेची शिक्षा दिली.
सूनेनच केले ‘हे’ कृत्य
हे धक्कादायक कृत्य दुसरे – तिसरे कोणी नाही तर त्या कुटुंबाची सून प्रज्ञा उर्फ ज्योती सुरवसे हिने केले. सासू , नवरा नणंद तसेच कुटुंबातील लोक त्रास देत असल्याने तिने जेवणात विषारी कीटकनाशक टाकले. वास्तुशांतीच्या दिवशी तिने हे औषध आणले होते. संध्याकाळी साडेचारच्या सुमारास तिने वरणाच्या बादलीत किटकनाशक औषध टाकले होते. ज्योती हिचा गावातील लोकांवरही राग होता म्हणूनच तिने हे पाऊल उचलले.
ज्योती सुरवसे हिचे सुरेश सुरवसे याच्याशी दुसरे लग्न झाले होते. मात्र कुटुंबातील सर्वजण नेहमी तिचा अपमान आणि मानसिक छळ करत असत. ज्योतीला सावळ्या रंगावरुन, तिला स्वयंपाक न येणे, तिचा पहिला विवाह मोडणे यावरून तिला सतत हिणवले जात असत. याचाच राग मनात ठेवून या सर्वांना धडा शिकण्यासाठी तिने हे कृत्य केल्याचे तिने कबुल केले.
कसा लागला प्रकरणाचा छडा
जेवणातून विषबाधा झाल्याचे समोर आल्याने पोलिसांनी आपली चक्रे फिरवत वेगाने तपासाला सुरुवात केली. किटकनाशकांमुळं ही विषबाधा झाल्याचे समजताच पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु केला. यादरम्यान ज्योती सुरवसे ही महिला तब्बल दोन ते तीन दिवसांनी रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. यावरुन पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी ज्योतीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. तेव्हा तिची कसून चौकशी केली असता तिने आपला गुन्हा मान्य केला.