पुणे | नगर सह्याद्री
पुण्याच्या स्वारगेट बस आगारात एका 26 वषय मुलीवर अत्याचार करण्यात आला. धक्कादायक आणि हैराण करणारे म्हणजे शिवशाही बसमध्ये नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार केलेला दत्ता गाडे हा तब्बल 70 तासांच्या सर्च ऑपरेशननंतर पोलिसांच्या ताब्यात आला. मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव दत्तात्रय गाडे असून तो एक सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत. मुलीला गोड बोलून त्याने बंद शिवशाही बसमध्ये नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला. हेच नाही तर तिला जीवे मारण्याची धमकी देखील त्याने दिली. आरोपीने घटनास्थळावरून थेट शिरूर तालुक्यातील गुनाट गाव गाठले. गुनाट गावात घरी तो सायंकाली 5.30 पर्यंत आराम करत होता.
रात्री साधारण 8.30 ला पाणी घेऊन शेतामध्ये मुक्कामासाठी गेला. इकडे स्वारगेट आगारात असलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटली. सकाळी सहा वाजता पोलिस पथक गुनाट गावात दाखल झाले. पोलिसांच्या तब्बल 13 पथकांनी त्याचा शोध घेतला. त्यानंतर आरोपी हा ऊसाच्या शेतात लपून बसला असल्याची कुणकुण पोलिसांना लागली. ड्रोनच्या माध्यमातून ऊसाच्या शेतातून आरोपीचा शोध घेतला जात होता.
श्वास पथक देखील गुनाट गावात पोहोचले. सायंकाळी चार 4 वाजता 100 पोलिसांची तपासणी पथक तयार करण्यात आली आणि गावात त्याचा शोध घेतला जात होता. हेच नाही तर ऊसाच्या शेतात रेस्क्यू करण्यासाठी पोलिसांची मदत गुनाट गावच्या ग्रामस्थांनी देखील केली. दत्तात्रय गाडे बारा वाजता ऊसाच्या शेतातून बाहेर आला आणि पाण्याची बॉटल घेऊन परत ऊसात गेला.तो ऊसाच्या शेताच्या बाजूला असलेल्या कॅनोलमध्ये झोपला.
रात्री दीड वाजता पोलिसांनी त्याला अखेर ताब्यात घेतले. यावेळी गाडेकडे रोगर औषधाची बॉटल देखील मिळाली. 1.45 दरम्यान पोलिस त्याला घेऊन पुण्याच्या दिशेला निघाले. साधारण 3 च्या दरम्यान त्याला पुण्यात आणले गेले. ससूनमध्ये आरोपीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आले. आरोपीने पीडितेला जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती.
दत्तात्रय गाडेची कुंडली आली समोर
आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर राजकीय वरदहस्त असल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा शिरुर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवाशी असल्याचे समोर आले आहे. तसेच त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याची गुन्हा करण्याची एक पद्धत ठरली होती. तो वृद्ध महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चारचाकी गाडीत बसवायचा आणि लुबाडायचा. मात्र एका महिलेच्या सतर्कतेमुळे त्याला पोलिसांनी पकडलं. त्याच्यावर शिक्रापूर आणि शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
लुटमार, दरोडा अन् बरेच काही!
गाडेने 2020 मध्ये शिरूर गावाच्या जवळ असलेल्या करे घाटात लूटमार केली होती. त्याच्यावर दरोड्याचा गुन्हा देखील दाखल होऊन त्याला शिक्षा देखील झाली होती. तसेच शिक्रापूर येथे दोन, अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा, केडगाव व कोतवाली पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. तसेच इतर गुन्ह्यांतील खटले प्रलंबित असल्याने तो मोकाट फिरत होता.
पत्नी, लहान मुले तरीही माती खाल्ली!
दत्तात्रय रामदास गाडे हा शिरुर तालुक्यातील गुणाट या गावचा रहिवाशी आहे. त्याच्या घरची परिस्थिती बेताची आहे. गावात त्याचे पक्क्या बांधकामातील पत्र्याचे छत असलेले घर आहे. तसेच वडिलोपार्जित तीन एकर शेतजमीन देखील आहे. आई-वडील शेतात काम करतात. तसेच त्याला एक भाऊ असून, पत्नी, लहान मुले आहेत. एवढं सुखी कुटुंब असून देखील दत्तात्रय काही कामधंदा करत नव्हता. नेहमी तो उनाडक्या करत फिरत होता. त्याला झटपट पैसे कमावायचा नाद लागला. त्या नादात त्याने चोरी करण्यास सुरुवात केली. लुबाडायला सुरुवात केली, अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे.
महिलांना लुटण्याचा अनोखा फंडा!
दत्तात्रय गाडे याने 2019 मध्ये कर्ज काढून एक चारचाकी विकत घेतली होती. त्या कारमधून तो पुणे ते अहिल्यानगर अशी प्रवाशी वाहतूक करत होता. या दरम्यान त्याने आपल्या चोरीची एक पद्धत ठरवलेली होती. ज्या महिलेच्या अंगावर जास्त दागिने असतील अशा ज्येष्ठ महिलांना तो लिफ्ट देत होता. त्यांना आडमार्गला नेऊन त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील दागिने चोरुन नेत असे.
एक लाखाचं बक्षीस नेमकं कुणाला?
दत्तात्रय गाडे याला काल मध्यरात्री अखेर अटक झाल्यानंतर आरोपीच्या शोधासाठी जाहीर करण्यात आलेले एक लाख रुपयांचे बक्षीस कोणाला मिळणार, हेही पोलिस आयुक्तांनी जाहीर केले आहे. पोलिस आयुक्त म्हणाले की, पथक दुपारी दोन वाजता गुनाट गावात पोहोचलं. गुनाट गावातील नागरिकांचे विशेष आभार, आम्ही स्वतः त्या गावात जाऊन नागरिकांचा सत्कार करणार आहोत. मदत करणाऱ्या लोकांचं अभिनंदन करणार आहोत. आरोपीची अखेरची माहिती देणाऱ्या नातेवाईकाला एक लाख रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. आरोपीच्या भावाचेही विशेष आभार. ही पोलिसांची एकत्रित कामगिरी होती, आमच्यात कोणताही श्रेयवाद नाही, असं पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं.
मंगळवारी तरुणीला ओरबाडलं, बुधवारी गावी जाऊन कीर्तन ऐकलं
शिवशाही बसमध्ये 26 वषय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी दत्तात्रय गाडे याला पकडण्यात पोलिसांना चौथ्या दिवशी यश आले आहे. स्वारगेट पोलिसांच्या पथकाने त्याच्या गुनाट गावातून शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास ताब्यात घेतले. फरार झाल्यापासून तो उसाच्या फडात लपून बसला होता. रात्री दीडच्या सुमारास दत्तात्रय गाडे नातेवाईकांकडे पाणी प्यायला आल्यानंतर, मला पश्चाताप होतोय. मला सरेंडर व्हायचं आहे, असे बोलला. तरुणीवर बलात्कार केल्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे बसने घरी गेला. त्यानंतर त्याने बुधवारी गावातील काल्याच्या कीर्तनात सकाळी हजेरी लावली, तर दुपारी पोलिस त्याचा शोध घेण्यासाठी त्याच्या गावी पोहोचले.
मीसुद्धा ‘गाडे’च, पण दत्ता नाही! तुम्हाला तो हवाय का?
आरोपी निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांचे पथक तातडीने आरोपीच्या शिरूर तालुक्यातील गुनाट या गावी पोहोचले होते. आरोपीच्या छायाचित्रावरून पोलिसांनी एका तरुणाला ताब्यातही घेतले. मात्र, तो आरोपी नसून त्याच्यासारखा हुबेहुब दिसणारा त्याचा भाऊ असल्याचे 15-20 मिनिटांनी स्पष्ट झाले. पोलिस आपल्या मागावर असल्याची माहिती या कालावधीत आरोपीला समजली आणि त्याने तेथून पळ काढला. दुपारी तीनच्या सुमारास पुणे पोलिसांचे पथक गुनाट गावात पोहोचले होते. त्यांनी आरोपीच्या घरावर धाड टाकली. तेव्हा घरामध्ये त्याचा भाऊ होता. तो दिसायला अगदी आरोपीसारखा आहे. पोलिसांनी आरोपी समजून त्याला ताब्यात घेतले. ‘आरोपी ताब्यात आला,’ या समजातून पोलिस काहीसे निश्चिंत झाले होते. मात्र, दुसरीकडे आरोपीच्या भावाला सर्व प्रकार समजल्यावर, त्याने ‘तो मी नव्हेच,’ असे सांगून ‘माझा भाऊ माझ्यासारखा दिसतो, तुम्हाला दत्ता गाडे हवाय का,’ अशी विचारणा केली. हे ऐकून पोलिसांना धक्का बसला. पोलिसांनी आरोपीच्या भावाची चौकशी करून त्याला सोडून दिले.
तहान-भुकेने व्याकूळ, मगरीचे अश्रू ढाळत म्हणाला…
गेल्या दोन दिवसांपासून पुणे पोलीस ज्याच्या मागावर होते, तो स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर अटक करण्यात आली आहे. बलात्काराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर दत्ता आपल्या गावी आला होता. माध्यमांतून त्याचे फोटो आणि बातमी आल्यानंतर त्याने आपल्या गावातूनही पळ काढला होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून भुकेने व्याकुळ आणि पिण्यासाठी पाणी नाही, या अवस्थेने तो बेचैन झाला होता. अखेर पाणी पिण्यासाठी तो आपल्या एका नातेवाईकाकडे आला. मला पश्चाताप झाला आहे, मला सरेंडर व्हायचं आहे, असं म्हणत तो नातेवाईकांकडे रडू लागला होता. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या परिसरामध्ये सापळा रचत त्याला बेड्या ठोकल्या.
‘रोगर’ची बाटली हातात असलेल्या गाडेला पकडणाऱ्या गणेश गव्हाणेंनी सांगितला थरार
दत्ता गाडे याला त्यांच्याच गावातील गणेश गव्हाणे यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दत्ताला कसं पकडलं हे सांगताना गव्हाणे म्हणाले की, आमच्या गावातील आरोपी दत्ता गाडे हा पोलिसांना सापडत नव्हता. पोलिसांनी मीटिंग घेऊन ग्रामस्थांना मदत करण्याची विनंती केली. पहिल्या दिवशी आरोपी पहाटे सव्वा पाच वाजता पाणी पिण्यासाठी आला होता, जेवणही करून गेला. त्यानंतर तो गायब झाला. संध्याकाळी साडे दहा वाजता महेश वेरट यांच्या घरी पाणी मागत होता. यावेळी महेश यांनी त्याचे लोकेशन दिले पण लगेच दत्ता चकवा देऊन फरार झाला. साडे दहापासून एक वाजेपर्यंत त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होते, मात्र तो काही हाती लागला नव्हता. मी आणि आमचे शेजारी साईनाथ आणि शाम हे सोबत होते. मी गाडीवर होतो, क्रिकेटच्या मैदानाकडे गाडी नेली, त्या ठिकाणी एक विहीर होती तिथे तो बसला होता. गाडीचा लाईट त्याच्यावर पडली तेव्हा तो उठून गावाच्या दिशेने पळू लागला, तेव्हा मी गाडीची लाईट सुरू ठेवली आणि पळत जाऊन त्याला पकडल्याचं गणेश गव्हाणेंनी सांगितलं. मी त्याला पकडल्यावर मला बोलला की, मला माझ्या मुलासोबत बोलूद्या, मी उद्या हजर होतो. तेव्हा त्याच्या हातामध्ये ’रोगर’ या औषधाची बॉटल होती, ती हिसकावून घेतली त्यामुळे अनर्थ टळला. पोलीस पाटलांना फोन लावला आणि त्याचे बोलणं करून दिलं. त्यानंतर सर्व पोलीस यंत्रणा गाडीत आली आणि त्याला पकडून नेल्याचं गणेश गव्हाणे यांनी सांगितलं.
पिडीतेवर दोनवेळा अत्याचार केले!
अत्याचाराच्या घटनेनंतर आरोपी दत्तात्रय गाडे याने मुलीला मारहाण केली होती आणि ही घटना कोणालाही न सांगण्यास सांगितले होते. मिळालेल्या माहितीनुसार त्याने पीडितेला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. पीडितेच्या वैद्यकिय तपासणीत हे स्पष्ट झाले आहे की, तिच्यावर दोनदा अत्याचार करण्यात आला. अत्याचारानंतर पीडित मुलगी ही फलटणच्या बसमध्ये बसून घरी जात होती. यावेळी तिच्या मित्राचा फोन आला आणि काय घडले ते संपूर्ण सांगितल्यानंतर तिच्या मित्राने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास तिला सांगितले होते.
तंटामुक्तीच्या निवडणुकीत पराभूत!
दत्तात्रय गाडे हा गुणाट गावाच्या तंटामुक्ती निवडणुकीसाठी देखील उभा राहिला होता. मात्र, त्या निवडणुकीत त्याचा पराभव झाला होता. याशिवाय निवडणुकीच्या काळात त्याने एका राजकीय पुढऱ्याचे निवडणुकीचे काम देखील केले असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या सोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत.
जलदगती न्यायालयात केस चालणार!
स्वारगेट एसटी डेपोत शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्काराच्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी हे पथक पुरावे गोळा करेल. यासाठी विशेष वकील दिला जाणार असून जलदगती न्यायालयात केस चालवणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. या घटनेनंतर शहरातील महिला सुरक्षेशी संबंधी सेफ्टी ऑडिट करण्यात येत आहे. नव्याने काही उपाययोजना केल्या जाणार आहेत. निर्जन स्थळं, टेकड्या, रेल्वे स्टेशन, डार्क स्पॉट यांचं सेफ्टी ऑडिट होईल. पोलिस पेट्रोलिंग अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
गावकऱ्यांचं सहकार्य मोलाचं
दत्ता गाडे याला अटक करण्यासाठी गावकऱ्यांनी मोठे सहकार्य केले. त्याने केलेल्या घटनेचे कोणतेही समर्थन होऊ शकत नाही, त्याने केलेली चूक ही अक्षम्य आहे, असे गावकऱ्यांकडून सांगण्यात आले. पण त्याचा गावात वावर चांगला होता. सर्वांशी चांगलं वागणं-बोलणं होतं. तो या थराला जाईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. नराधम दत्ता गाडेचा पोलिसांकडून कार्यक्रम, लष्करी पोलिस ठाण्यात आणलं, पोलिसांनी सांगितलं पुढे काय घडणार?
दोरी तुटल्याने आत्महत्येचा प्रयत्न फसला!
घटनेनंतर आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती पोलिसांनी दिलीये. दोरी तुटल्याने त्याचा प्रयत्न फसला. आरोपीच्या गळ्यावर व्रण असल्याचीही माहिती पोलिसांकडून देण्यात आलीये. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतरच खरे काय ते समारे येईल, असेही पुणे पोलिस आयुक्तांनी सांगितले आहे. आरोपीने या घटनेनंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, दोरी तुटल्याने त्याचा हा प्रयत्न फसला.
वृद्धेने पाणी नाकारलं
बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास परिसरातील एका वस्तीवर वृद्धेच्या घरी पिण्याचे पाणी मागण्यासाठी तो गेला होता. त्या वेळी वृद्धेने ‘तू तर टीव्हीवर दिसत आहेस. तुला मी पाणी देणार नाही,’ असे सांगितले. त्यानंतर तो तिथून पळून गेला, असे संबंधित वृद्धेने पोलिसांना सांगितले.