Datta Gade: पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसरात एका २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दत्ता गाडेला अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर त्याच्या अनेक गैरकृत्यांचा उलगडा होत आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, त्याने यापूर्वीही अनेक महिलांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता, तसेच एका भाजी विक्रेत्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली होती.
आता आरोपी दत्ता गाडे याचा पोलिसांच्या वेशातील एक फोटो समोर आला आहे, ज्यामुळे त्याच्या आणखी एका गुन्हेगारी कृत्याची माहिती उघड झाली आहे. गाडे पोलिसांचा गणवेश घालून वेगवेगळ्या बस स्थानकांवर फिरत असे आणि पोलीसअसल्याचा बनाव करून प्रवाशांना लुटत असे. तपासात असेही समोर आले आहे की, आरोपी विवाहित असून त्याला एक मुल आहे. मात्र, तो घरी कमी आणि बाहेर जास्त भटकंती करत असे. पुणे स्वारगेटसह अहमदनगर शिरूर शिक्रापूर, सोलापूरअशा विविध बस स्थानकांवर त्याचा वावर होता.
तो वेगवेगळ्या बस स्थानकांवर वेगवेगळ्या वेषात, कधी बस कंडक्टर तर कधी पोलीस बनून, लोकांना लुटत असे. पोलीस असल्याची बतावणी करून त्याने अनेकांना फसवल्याचे उघडकीस आले आहे. एका गुन्ह्यात आरोपीनं नगरहून पुण्याकडे जाण्यासाठी निघालेल्या महिलेला टार्गेट केलं होतं. तक्रारदार महिला नगर बस स्थानकात बसची वाट पाहत होती. यावेळी आरोपी गाडे तिथे चारचाकी घेऊन तिथे आला. ‘मी देखील पुण्याला चाललो आहे, तुम्हाला सोडतो,’ असं त्याने महिलेला सांगितले. पीडित महिलेनं आरोपीवर विश्वास ठेवल्यानंतर त्याने चारचाकी निर्जनस्थळी घेऊन जात तिचा गळा दाबला आणि तिच्याकडील दागिने हिसकावले होते.