पारनेर/ नगर सहयाद्री:-
तालुक्यात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यावर तातडीने उपाययोजना व्हाव्यात यासाठी भाजप राज्य परिषद सदस्य मा. जि. प. सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि वनसंरक्षक अधिकाऱ्यांना निवेदन दिले. शिरूर, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांच्या सीमा पारनेरला लागून असून, या भागात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यातील गावांना हल्ल्यांचा धोका वाढला आहे.
सध्या ऊसतोडणीचा हंगाम सुरू असल्याने दबा धरून बसलेले बिबटे बाहेर पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे अनुचित घटनांचा धोका वाढला आहे. शिरूर तालुक्यातील अलीकडील हल्ल्यांच्या घटनांनंतर तेथील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर शासन आणि वनविभागाने कारवाई केली होती. अशाच प्रकारे पारनेर तालुक्यातही नवीन घटना घडण्याची वाट न पाहता तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी कोरडे यांनी केली. यामुळे नागरिकांमधील भीतीचे सावट कमी होण्यास मदत होईल.
निवेदन देताना कोरडे यांनी पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांशी तातडीने बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे आवाहन केले. वनसंरक्षक अधिकाऱ्यांनी यावर लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी भाजप तालुका उपाध्यक्ष अर्जुन नवले, मोहन काळे, सुशांत ठुबे, गोकुळ ठुबे, कानिफनाथ ठुबे, संदीप ठुबे, राजेंद्र रासकर, रमेश गाडगे, विजय गुगळे, दीपक ठुबे, अण्णा सालके, अंकुश बुचुडे, भाऊसाहेब गाडगे, शिवाजी जाधव, सुरेश भागवत, हनुमंत भागवत यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
पारनेर तालुक्यात गेल्या महिन्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या तीन घटना घडल्या, सुपा व पारनेर परिसरात बिबटे पकडण्यास यश आले परंतु पारनेर तालुक्याच्या सीमालगत असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बिबटे आहेत व हल्ल्याच्या घटना वारंवार घडत आहेत हे लक्षात घेऊन अनुचित प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात.
विश्वनाथ कोरडे (मा. जि. प. सदस्य)



