Crime News: उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका पतीने आपल्या पत्नीची हत्या करून तिला आत्महत्या असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. ३५ वर्षीय शिक्षिका रूबी आपल्या बेडरूममध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली. विशेष म्हणजे, तिच्या चार वर्षांच्या मुलीने व्हिडिओ कॉलद्वारे ही माहिती आपल्या आजीला दिली. “पप्पांनी मम्मीला लटकवले आहे, ती काही बोलत नाही,” असे मुलीने सांगितले.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी पती रोहित कुमार हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून, तो आपल्या पत्नी रूबी आणि चार वर्षीय मुलगी ओजस्वी हिच्यासह मुरादाबादच्या बुद्धी विहार परिसरात राहत होता. रूबी ही कुंदरकी येथील बेसिक शिक्षण विभागात शिक्षिका म्हणून कार्यरत होती. बुधवारी रात्री रूबी आपल्या घरात गळफास घेतलेल्या स्थितीत सापडली. ही माहिती तिच्या चार वर्षांच्या मुलीने व्हिडिओ कॉलद्वारे तिच्या आजीला दिली. फोनच्या स्क्रीनवर रूबीचा मृतदेह दिसताच कुटुंबीय हादरले आणि त्यांनी तातडीने मुरादाबाद गाठून पोलिसांत तक्रार नोंदवली.
रूबीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार करताना सांगितले की, तिचा पती रोहित सतत पैशांची मागणी करायचा. त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद सुरू होते. कुटुंबीयांचा आरोप आहे की, रोहितनेच तिची हत्या करून त्याला आत्महत्येचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. माझोला पोलिस ठाण्याचे निरीक्षक मोहित चौधरी यांनी सांगितले की, रोहित कुमारला अटक करण्यात आली असून, त्याची चौकशी सुरू आहे. दरम्यान, रूबीच्या मृतदेहाचा पोस्टमार्टम करून पुढील तपास केला जात आहे.