मुंबई | नगर सहयाद्री
राज्यात ‘ऑक्टोबर हिट’मुळे तापमान वाढले असताना आता हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्र आणि ‘मोंथा’ या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, ‘मोंथा’ चक्रीवादळाचे रुपांतर अतितीव्र चक्रीवादळात झाले असून ते आज (मंगळवार) रात्री आंध्र प्रदेशातील काकीनाडा किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा वेग ताशी ८० ते ८५ किमीपर्यंत असू शकतो. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील पूर्व विदर्भात आज व उद्या जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विशेषतः नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.हवामान खात्याने राज्यातील मुंबई, मुंबई उपनगर, कोकण व विदर्भासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. पुढील काही दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे.
दरम्यान, अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा ‘मोंथा’च्या प्रभावामुळे २७ ते ३० ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्र–गुजरात किनाऱ्याजवळ स्थिर राहील, तर ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान गुजरातमार्गे राजस्थानकडे सरकण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आणि अधिकृत हवामान अद्यतनावर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.



