अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर येथील टाटा मोटर्स शोरूम (एमआयडीसी) येथे काम करणाऱ्या कस्टमर ॲडव्हायझरने ग्राहकांना दिशाभूल करत 3 लाख 81 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी नुसार, विशाल अरुण गायकवाड (वय ३५, रा. शकुंतला निवास, साई मंदिर जवळ, सौरभ नगर, अहिल्यानगर) याने २८ मार्च २०२५ ते २० जून २०२५ दरम्यान शोरूमच्या ग्राहकांकडून गाडी खरेदीसाठी घेतलेली रक्कम थेट स्वतःच्या स्टेट बँक ऑफ इंडिया खात्यात जमा करून घेतली.
त्याने ही रक्कम शोरूमच्या अधिकृत बँक खात्यात जमा केली नाही. या प्रकारामुळे शोरूमचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, ग्राहकांचा विश्वासघात केला, असे शोरूमचे जनरल मॅनेजर शेख इरफान सलाउद्दीन (वय ५०, रा. सीआरव्ही कॉलनी, मुकुंदनगर, अहिल्यानगर) यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.