spot_img
ब्रेकिंगतब्बल १९ बोगस कंपन्यांमधून कोट्यवधी लुटले; मोबाईल चालू तरी पोलिसांना सापडेना संदीप...

तब्बल १९ बोगस कंपन्यांमधून कोट्यवधी लुटले; मोबाईल चालू तरी पोलिसांना सापडेना संदीप अन् त्याची टोळी…

spot_img

 पोलीस अधिकार्‍यांच्या भूमिकाच संशयास्पद
स्पेशल रिपोर्ट / शिवाजी शिर्के –
सह्याद्री मल्टीनिधी ही कंपनी कायद्यानुसार नोंदणीकृत असताना त्या कंपनीच्या माध्यमातून बँकींग- पतसंस्थेचे व्यवहार केले. त्यातून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी मिळवल्या. त्या रकमांचा अपहार केला आणि सह्याद्रीने गाशा गुंडाळला. हजारो कोटी रुपये त्यात अडकले. यानंतर संदीप थोरात परागंदा झाल्याच्या वावड्या उठल्या (नव्हे त्या उठवल्या).  यानंतर संदीप थोरात याने शेवगाव- पाथर्डी भागात पहिली चाल खेळली ती क्लासीकब्रीज या कंपनीच्या नावाने! दुसरी चाल खेळली ती मनीमॅक्स फायनान्सच्या नावाने! या दोन्ही कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यवधींना गंडा घालणार्‍या संदीप थोरात व त्याच्या टोळीतील विश्वास विजय पाटोळे, नामदेव नंदलाल पवार याच्यासह त्याच्या अन्य दोन सहकार्‍यांनी वाशी- नवी मुंबई येथील एकाच पत्त्यावर तब्बल १९ कंपन्यांचे कार्यालय थाटले. या सार्‍या कंपन्या फक्त कागदावरच असल्याचे समोर आले आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून त्याने राज्याच्या वेगवेगळ्या भागात तीन महिन्यांत दामदुप्पट, दाम तिप्पट व महिन्याला १० ते १२ टक्के जादा परताव्याचे अमीष दाखवले आणि त्याच्या या अमिषाला अनेकजण बळी पडले. आता या सार्‍यांना तोंड फोडून घेण्याची वेळ आली आहे. संदीप थोरात व त्याच्या टोळीतील सार्‍या सदस्यांचे मोबाईल कालपर्यंत चालू होते. या सार्‍यांच्या विरोधात गुन्हे दाखल असताना संदीप थोरातसह त्याचे साथीदार पोलिसांना सापडले नाही हे विशेष! एकूणच या संपूर्ण प्रकरणात जिल्ह्यातील पोलिस अधिकार्‍यांची भूमिकाच संशयास्पद झाली असल्याने दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न आता या प्रकरणातील पिडीतांसमोर पडला आहे.

सुप्यातील एका फायनान्स कंपनीच्या ओपनिंगला डीवायएसपी!
कोणतेही सरकारी लायसन नाही, तरीही फायनान्स कंपनी असल्याचे दाखवत मध्यंतरी मोठा गाजावाज करत सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये एका खासगी फायनान्स कंपनीचा शुभारंभ झाला. मोठा गाजावाजा करत झालेल्या या कार्यक्रमाला खा. निलेश लंके यांनी हजेरी लावत या कंपनीच्या कामाचे कौतुक केले होते. त्याच कार्यक्रमाला डीवायएसपी दर्जाचा अधिकारीही गणवेशासह हजेरी लावून होता. सदर कार्यक्रमाला जाताना ही फायनान्स कंपनी नोंदणीकृत आहे की नाही यासह वरिष्ठांची परवानगी त्या अधिकार्‍याने घेतली होती का असे अनेक प्रश्न समोर आले आहेत. मात्र, पोलिस अधिकारीच अशा कार्यक्रमांना हजर राहिल्याने सामान्यांचा विश्वास त्यावर बसतो आणि पुढे जाऊन संदीप थोरात सारख्या अवलादींचे फावते हे वास्तव लक्षात घेण्याची गरज आहे.

अभिनेता मकरंद अनासपुरेंचा संदीप थोरात करणार होता बकरा!
फ्रॉड गँगचा मास्टरमाईंड राहिलेल्या संदीप थोरात याने मध्यंतरी प्रसिद्ध क्रिकेटपट्टू विनोद कांबळी यांना नगरमध्ये हेलिकॉप्टरने आणले. यानंतर त्यांच्या आजारपणात मदत केल्याची आवई उठवली. यानंतर त्याने अनेकांना टोप्या घातल्या आणि तो पसार झाला. मनीमॅक्स फायनान्स कंपनीच्या माध्यमातून टोप्या घालण्याची दुसरी इनिंग सुरू करण्याआधी या कंपनीच्या मार्केटींगसाठीची जाहीरात त्याने तयार केली. सदर जाहीरात करण्यासाठी त्याने मराठी अभिनेता मकरंद अनासपुरे यांना गाठले. अनासपुरे यांनी थोरात याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि चांगले काम करत असल्याची पावती देत जाहीरातीचे अग्रीमेंट करण्यास अनुकुलता दर्शवली. दोन दिवसांनी या दोघांची पुन्हा भेट होणार होती. मात्र, या दोन दिवसात मकरंद अनासपुरे यांनी त्यांच्या नगरमधील काही मित्रांकडे संदीप थोरात याच्या कामाची माहिती मिळवली आणि हा संदीप थोरात अनेकांना टोप्या घालणारा असल्याचे समोर आले. यानंतर अनासपुरे यांनी थोरात साठी त्यांचे दरवाजे बंद केले.

संदीपच्या भानगडबाज कंपनीचे कार्यालय अन् त्याचे डिटेल्स आले समोर!
संदीप थोरात व त्याच्या ठगबाज टोळीने पश्चिम महाराष्ट्राला गंडा घालण्यासाठी नवीन टीम भरती करणारी जाहीरात दिली. त्या जाहीरातीत त्यांनी दिलेला पत्ता- हेड ऑफिस – अम्बिएंस कोर्ट,ऑफिस नंबर ६०६,सेटर १९ डी,वाशी,आरटीओ ऑफ़िस च्या समोर.नवी मुंबई-४००७०९ असा असून संपर्कासाठी त्यांनी ९११२१०६८६८ हा मोबाईल क्रमांक दिला आहे. या नंबरबाबत आम्ही अधिक माहिती मिळवली असता हा मोबाईल क्रमांक संदीप थोरात याच्या अत्यंत विश्वासू गोटातील समजल्या जाणार्‍या सांगळे नामक महिलेचा असल्याचे समोर आले आहे. सदरची महिला मुळची नगर एमआयडीसी परिसरात राहणारी असून सध्या त्यांचे वास्तव्य नवी मुंबई मध्ये असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.

सिस्पे फिनोवेल्थ कंपनीने घातला हजारो कोटींना गंडा!
सुपा परिसरातील अनेकांना सिस्पे फिनोवेल्थ या कंपनीने आकर्षक परतावा मिळवून देण्याच्या नावाखाली पाचशेपेक्षा जास्त कोटींना गंडविले असल्याचे वास्तव समोर आले आहे. नवनाथ जगन्नाथ अवताडे आणि त्याची पत्नी सुवर्णा नवनाथ अवताडे हे दोघे या कंपनीचे डायरेक्टर आहेत. दोघांनी मिळून अत्यंत पद्धतशिरपणे जास्त परताव्याचे अमिष दाखवत सुपा परिसरातील अनेकांना टोप्या घातल्या असल्याचे समोर आले असून सध्या या कंपनीच्या येथील कार्यालयास कुलूप असल्याचेही समोर आले आहे.

नगरमधील ‘त्या’ कंपनीची नोंदणीच नसल्याचे झाले उघड!
संदीप थोरात याने फायनान्स कंपनी असल्याचे भासवले. याशिवाय त्याने मध्यंतरी संपूर्ण नगर शहरात आणि जिल्ह्यात ज्या कंपनीच्या नावाने होर्डींग्ज लावले होते, त्या कंपनीबाबत काहींना शंका आल्या. ‘तुझी कंपनी एमसीए कडे सर्च होत नाही’, असे त्याला काहींना विचारले असता त्याने संबंधितांना ‘तक्रार करा’ असे उत्तर दिले होते. मुळात ज्या कंपनीच्या नावाने त्याने फ्लेक्स, होर्डींग्ज लावले होते ती कंपनीच नोंदणीकृत नव्हती आणि अस्तित्वातही नसल्याचे एका माजी सनदी अधिकार्‍याने केलेल्या अभ्यासात समोर आले.

आरोग्य विभाग भरतीची फसवी जाहिरात देऊन ठगवले!
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नावाने बोगस जाहीरात देऊन तेथील कामासाठी भरती असल्याची जाहीरात याच संदीप थोरात याने मध्यंतरी दिली. त्या जाहीरातीच्या माध्यमातून त्याने लाखो रुपयांची रक्कम मिळवली. अर्जासोबत त्याने दिलेल्या बँक डिटेल्सवर अर्जदारांनी पैसे पाठवले. आता त्या जाहीरातीच्या बदल्यात अर्जदारांना कोणत्याही परीक्षेचा कॉल आलेला नाही. याचाच अर्थ त्याने सरळसरळ बेरोजगारांना गंडविण्यासाठी ही शक्कल लढवली आणि त्यात तो यशस्वी झाला.

‘सिस्पे’मध्ये तब्बल पाच हजार कोटी!
सुप्यासह नगर शहर आणि जिल्ह्यात तीन महिन्यांत दामदुप्पट, दाम तिप्पट व महिन्याला १० ते १२ टक्के जादा परताव्याचे आमिष दाखवणार्‍या कंपन्यांनी मोठे जाळे निर्माण केले आहे. मोठे एज़ंट आणि त्यासाठी त्याच परिसरातील काही विश्वासू मंडळींना परतावा देत कंपन्यांनी हजारो कोटी रुपये जमा केले आहेत. यात शिस्पे नामक एक कंपनी देखील आहे. या कंपनीकडे जवळपास पाच हजार कोटी रुपयांच्या रकमा असल्याची माहिती समोर आली आहे. क्लासीकब्रीज, मनीमॅक्स फायनान्स यासारख्या कंपन्यांनी कोट्यवधीचा गंडा घातला असताना आता सार्‍याच कंपन्यांचे वास्तव समोर यायला सुरुवात झाली आहे.

‘आगमन’च्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्राला चुना लावण्यास सज्ज झाली संदीपची टोळी!
संदीप थोरात आणि त्याच्या टोळीने वेगवेगळ्या बोगस कंपन्यांच्या माध्यमातून विदर्भातील काही जिल्ह्यांसह नाशिक, जळगावमध्ये कोट्यवधींना चुना लावल्यानंतर ‘आगमन फाईनांशियल सर्व्हिसेस लि‘ ही कंपनी आता संदीप थोरात व त्याच्या टोळीने पुढे आणली असल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बोगस  फायनान्स कंपनिकरिता सातारा,सांगली,कोल्हापूर,सोलापूर,पुणे,नाशिक जिल्ह्यातील शाखांसाठी अधिकारी- कर्मचारी भरती करणारी जाहीरात गेल्या दोन महिन्यांपासून प्रकाशित होत आहे. या जाहीरातीनुसार सातारा,सांगली,कोल्हापूर,सोलापूर,पुणे,नाशिक येथे प्रत्येकी एक यानुसार असीस्टंट रिजनल मॅनेजर त्याला पगार ४५ हजार. बँ्रच मॅनेजरच्या ५२ जागा आणि त्यांना प्रत्येकी पगार ३५ ते ४० हजार रुपये. सेल्स मॅनेजरच्या १५० जागा आणि त्यांना पगार १५ ते २० हजार, ऑपरेशन मॅनेजरच्या ७५ जागा आणि त्यांना पगार १० ते १५ हजार रुपये. अशी मोठी जाहीरात संदीपच्या टोळीने दिली आहे. अर्जदारांना अर्ज करण्यासाठी हेड ऑफीस म्हणून वाशी- नवीमुंबईमधील मनीमॅक्स कंपनीचा पत्ताच देण्यात आला आहे. म्हणजेच आगमन या कंपनीच्या माध्यमातून संदीप थोरात आणि त्याची टोळी पश्चिम महाराष्ट्रात शिरकाव करत आहे आणि नगरचे पोलिस अधिकारी या कंपनीसह संदीप सारख्या भामट्याला पायघड्या घालताना दिसत आहेत.

नोंदणी केली असल्याचे दाखविलेल्या कंपन्यांची ही आहेत नावे!
संदीप थोरात स्वत: संचालक (डायरेक्टर) असलेल्या व कंपनी कायद्यानुसार नोंदणीकृत असल्याचे दाखविण्यात आलेल्या कंपन्यांची नावे आमच्या हाती आली आहेत. सह्याद्री मल्टिसीटी निधी लि. भिषीवाला चीटफंड प्रा. लि., थोरात अ‍ॅक्वा अँड मिल्क प्रा. लि., माहेर ब्युटी अँड ट्रेनींग सेंटर प्रा. लि. सह्याद्री मल्टिसीटी आगडगाव निधी लि., सह्याद्री मल्टिसीटी मेहेकरी निधी लि., सह्याद्री मल्टिसीटी खडकी निधी लि., सह्याद्री मल्टिसीटी कौडगाव निधी लि., सह्याद्री मल्टिसीटी कापूरवाडी निधी लि., सह्याद्री मल्टिसीटी डोंगरगण निधी लि., सह्याद्री मल्टिसीटी दरेवाडी निधी लि., सह्याद्री मल्टिसीटी देऊळगाव निधी लि., ऑनधीस मिडिया प्रा. लि., सह्याद्री मल्टिसीटी फायनान्स प्रा. लि., क्लासीक ब्रीज मनी सोलुश्यन्स प्रा. लि. नगर तालुक्यातील काही गावांची नावे कंपनीच्या नावात असल्याचे दिसते. या गावांची नावे वापरत सह्याद्री मल्टिसीटी निधी या कंपन्यांची नोंद करण्यात आली आणि त्याच गावांमध्ये कंपनीचे कार्यालय थाटले. ठेव रक्कम स्वीकारणे अथवा कर्ज देणे अथवा बँकींग- पतसंस्थांसारखे व्यवहार करण्यास कोणतीही परवानगी नसताना संदीप थोरात याने गावेच्या गावे लुटली!

डीडीआर अन् एआर ऑफीसचे अधिकारीच पार्टनर!
खासगी सावकारकी करत असल्याची साधी तक्रार आली तरी लागलीच त्याला बेड्या ठोकण्यास आणि त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास सहकार विभागाचे डीडीआर आणि एआर ऑफीस सरसावते. पोलिसही मागे पुढे पाहत नाहीत. संदीप थोरातकडे कोणतेही बँकींग लायसन नसताना त्याने गावोगाव कंपनीचे दुकान थाटले आणि त्यातून लाखोंना चुना लावला. सहकार विभागाच्या अधिकार्‍यांना संदीप थोरात दिसलाच नाही, असे म्हणणे धाडसाचे होईल. मुळात या अधिकार्‍यांच्या टक्केवारीच्या धोरणात संदीपचे फावत गेले आणि जास्तीच्या परताव्याच्या अमिषाने अनेकांना गंडा बसला.

पाइपलाइन रोडवर थाटून बसलाय कार्यालय!
सावेडी उपनगरातील पाईपलाईन रस्त्यावर संदीप थोरात याने कार्यालय थाटले असल्याचे समोर  आले आहे. या कार्यालयात तो बसून असतो. पूर्वीसारखा प्रसिद्धीच्या झोतात न राहता संदीप थोरात पडद्याआड राहून सर्व सुत्रे हलवत आहे. पाईपलाईन रस्त्यावरील एका बिल्डींगमध्ये थाटलेल्या कार्यालयात संदीप थोरात याचा वावर असताना तो पोलिसांना दिसत नाही यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही.

डीवायएसपी दर्जाचा अधिकारी सांभाळतोय का संदीप थोरातला?
अनेकांना गंडा घालणारा संदीप थोरात त्याचा मोबाईल चालू ठेवून नगरमध्येच ठाण मांडून असल्याचे समोर आले आहे. त्याचे अनेकांशी व्हाटसअप कॉल होत आहेत. याचाच अर्थ त्याचा मोबाईल बंद नाही. भुरट्या चोर्‍या करणार्‍याला पोलिस त्याच्या मोबाईलचे लोकेशन घेत पकडतात आणि त्याला पकडल्याचा तोरा मिरवतात. संदीप थोरात याने कोट्यवधी रुपयांना गंडा घातला असताना आणि त्याच्या विरोधात गुन्हे दाखल असतानाही तो पोलिसांना सापडत नाही की त्याला कोणी शोधत नाहीत असा सवाल आहे. नगर जिल्हा पोलिस दलातील डीवायएसपी दर्जाच्या अधिकार्‍याचे याच संदीप थोरात याच्याशी उठबस असल्याची चर्चा आहे. याशिवाय त्याच्याकडून या अधिकार्‍याचा ‘साग्रसंगीत’ पाहुणचार होत असल्याच्या चर्चाही झडत आहेत. संदीप थोरात याला पकडले जात नाही याचाच अर्थ या अधिकार्‍याचा पोलिसांवर दबाव आहे काय असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतो आहे.

सह्याद्री मल्टिस्टेट नव्हे सह्याद्री मल्टिनिधी!
शब्दांचा खेळ खेळण्यात पटाईत असणार्‍या संदीप थोरात याने सह्याद्री मल्टीनिधी कंपनी स्थापन केले आणि कंपनी कायद्यानुसार त्याची नोंदणी केली. वास्तविक पाहता या कंपनीला ठेवी जमा करण्याचा किंवा पतसंस्था- बँकांप्रमाणे बँकींग व्यवहार करण्याचा कोणताही परवाना नव्हता आणि नाही.मात्र, त्याने मल्टिनिधी शब्दाचा वापर करत मल्टीस्टेटसारखे नामसाधर्म्य जुळवले आणि येथेच सामान्य ठेवीदारांचा मोठा घात झाला.

पश्चिम व मध्य महाराष्ट्रात कोठे घातला जाणार होता गंडा?
सातारा रिजन लोकेशन- सातारा शहर , सातारा मेढा, वाई, लोणंद, शिरवळ, फलटण, कोरेगाव, कराड, पाटण,उंब्रज, खंडाळा,निरा, पांचवड. पुणे रिजन लोकेशन- खराडी, बारामती, जेजुरी, लोणीकाळभोर, उरुळी कांचन,मोरगाव, इंदापूर. सांगली रिजन लोकेशन- सांगली शहर, विटा,तासगाव, पलूस,जयसिंगपूर, इस्लामपूर, शिराळा. कोल्हापूर रिजन लोकेशन-  कोल्हापूर शहर, कोल्हापूर इचलकरंजी,कागल,हुपरी,गडहिंग्लज. सोलापूर रिजन लोकेशन- सोलापूर शहर – ४ शाखा, कुर्डूवाडी, टेंभुर्णी, अकलूज, सांगोला, पंढरपूर,मंगळवेढा, मोहोळ, बार्शी,माढा, वैराग, माळशिरस,करमाळा, वेळापूर, जेऊर, करकंब,महूड,नातेपुते. नाशिक रिजन लोकेशन- तिडके कॉलनी आणि लेखा नगर.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सख्खा भाऊ पक्का वैरी!; लहान भावाला संपवल, ‘धक्कादायक’ वास्तव समोर..

Crime News: सातवड (ता. पाथर्डी) येथील संत्र्याच्या बागेत एका तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस...

उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? तर तर ‘ही’ आहेत सर्वोत्तम ठिकाणे

मुंबई । नगर सहयाद्री:- कडक उन्हाळ्यात बरेच जण बाहेर फिरायला जायचा प्लॅन करत असतात....

रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! १०० आणि २०० च्या नव्या नोटा लॉन्च करणार!, जुन्या नोटा…

Reserve Bank Of India: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक मोठी घोषणा केली आहे. १००...

नशीब चमकणार! ‘या’ राशीसाठी आनंदाची बातमी, वाचा राशिभविष्य..

मुंबई । नगर सह्याद्री मेष राशी भविष्य तुमची कमकुवत इच्छाशक्ती यामुळे तुम्ही भावनिक व मानसिकदृष्ट्या कमजोर...