‘सह्याद्री’ पतसंस्थेतील कोट्यवधींच्या घोटाळ्यात फरार | चालकाच्या नावाने उघडली ‘मनीमॅक्स’ कंपनी | पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह
स्पेशल रिपोर्ट । शिवाजी शिर्के
नगर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सह्याद्री मल्टीस्टेट पतसंस्थेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी जमा केल्यानंतर संस्थेतील ठेवीदारांच्या रकमेवर डल्ला मारत ही संस्थाच बंद करुन परागंदा झालेला संस्थेचा प्रमुख संदीप थोरात हा पोलिसांना आजही वाँटेड आहे. पोलिस दप्तरी फरार आणि पाहिजे असतानाही याच संदीप थोरात याने त्याच्या चालकाच्या नावाने मनीमॅक्स फायनान्स कंपनी नोंदणीकृत केली. कंपनीचे मुख्यालय मुंबईत दाखवले आणि कमीशन एजंट नियुक्त करत जिल्ह्यात पुन्हा धुमाकुळ घातला. एकट्या सुपा औद्योगिक वसाहत पट्ट्यात संदीप थोरातच्या या बोगस कंपनीने सुमारे पाचशे कोटी रुपयांना चुना लावल्याचे उघड झाले आहे. पोलिसांकडे याबाबत अद्याप कोणीही तक्रार द्यायला समोर आलेले नाहीत. मात्र, संदीप थोरात या भामट्याने अत्यंत थंड डोक्याने पहिल्या गुन्ह्यात वाँटेड असतानाही कोट्यवधींचा घोटाळा केल्याचे समोर आल्याने पोलिस नक्की काय करतात असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. दरम्यान जवळपास पाचशे कोटींचा घोटाळा घातल्यानंतर संदीप थोरात, त्याचा सहकारी व्यास आणि चालक विश्वास पाटोळे हे पसार झाले असल्याचे समोर आले असून त्यांचे मोबाईलही बंद झाले असल्याने ठेवीदारांची मोठी पंचाईत झाली आहे.
शेवगाव-पाथडत क्लासीकब्रीजच्या नावाने घातल्या टोप्या!
शेवगाव- पाथड तालुक्यातील ठेवीदारांना याच संदीप थोरात याने क्लासीक ब्रीज या फायनान्स कंपनीचे नाव वापरत कोट्यवधी रुपयांना झोपवले. अनेकांनी त्यांच्याकडील पुंजी याच थोरातच्या भरवशावर ठेवली. त्यांना त्याने टोपी घातली. शेवगाव- पाथडत क्लासीक ब्रीज नावाच्या कंपनीच्या माध्यमातून हा बाजार मांडताना संदीप थोरात याने स्वत:ची ओळख लपवली. तेथेही त्याने दुसऱ्याच ठगांना संचालक म्हणून उभे केले आणि स्वत: नामानिराळा राहिला. वाशी- नवीमुंबईतील एकाच कार्यालयाच्या पत्त्यावर वेगवेगळ्या फायनान्स कंपन्या त्याने दाखवल्या आणि त्यामाध्यमातून त्याने हा सारा खेळ खेळला.
जेऊर बायजाबाई येथील विश्वास पाटोळे हा आहे संचालक!
नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई येथील विश्वास विजय पाटोळे हा मनीमॅक्स कंपनीचा संचालक असल्याचे दाखविण्यात आले. यासाठी त्याचा बीटीएक्सपीपी2955जी हा पॅन क्रमांक वापरला गेला.याशिवाय त्याच्या आधार कार्डमधील शेवटचे चार डिजीट आकडे (9759) दाखविण्यात आले आहेत. मुळात हा विश्वास पाटोळे हा संदीप थोरात याच्याकडे वाहन चालक आहे. त्यालाच संचालक दाखवून त्याच्या खात्यावर अनेकांचे कोट्यावधी रुपये घेण्यात आले आणि त्याच्या खात्यावरुन संदीप थोरात याने ते काढून घेतल्याचेही समोर आले आहे.
संदीप थोरात-विश्वास पाटोळे आणि अमोद व्यास हे त्रिकुट पुन्हा झाले पसार!
सातारा, कोल्हापूर येथे कोट्यवधी रुपयांना चुना लावणाऱ्या व्यास नामक ठगाची आणि संदीप थोरात याची ओळख झाली आणि पुढे जाऊन या दोघांनी नगर जिल्ह्यात जाळ्य टाकले. सह्याद्रीच्या माध्यमातून अनेकांना रस्त्यावर आणल्यानंतर या दोघांनी क्लासीकब्रीज ही कंपनी समोर आणली. त्यानंतर आता या दोघांनी विश्वास पाटोळे याला पुढे केले आणि मनीमॅक्स ही कंपनी समोर आणत कोट्यवधी रुपयांना गंडा घातला.
पत्रकाराला देखील ठगवले!
संदीप थोरात हा मध्यंतरी काही काळ पत्रकारीतेत आला. मात्र, घोटाळेबाजीनंतर त्याला ते दैनिक बंद करावे लागले. यानंतर त्याने वेगवेगळ्या फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातून टोप्या घालण्यास सुरुवात केली. आकर्षक परतावा देऊन विश्वास संपादन केल्यानंतर जास्त परताव्याच्या मोहात अनेकजण आले. त्यातून पारनेरमधील एक पत्रकार देखील मोहात पडला. त्या पत्रकाराचे आता या बोगस कंपनीत पैसे अडकले असल्याचे समोर आले आहे.
मनीमॅक्स फायनान्स ॲडव्हायझर कंपनीच्या नावाने कोट्यवधींचा झोल!
वाशी, नवीमुंबई येथे सेक्टर 19 डी येथील प्लॉट नं 2 मध्ये 606 क्रमांकाचे कार्यालय असणाऱ्या जागेत त्याने मनीमॅक्स फायनान्स ॲडव्हायझर प्रा. लि. या नावाने कंपनी कार्यालय सुरू केले. तसा त्याने त्याच्या लेटरहेडवर उल्लेख केला आहे.
नवी मुंबईत आलिशान कार्पोरेट ऑफीस!
नगरमध्ये अनेकांना गंडा घातल्यानंतर संदीप थोरात परागंदा झाला. तो कोठेच सापडत नसल्याचे आजही पोलिस सांगतात. मात्र, त्याने वाशी (नवी मुंबई) मध्ये अत्यंत प्राईप लोकेशनमध्ये अलिशान कार्यालय भाड्याने घेतले. मात्र, त्याचा भाडेपट्टा त्याने त्याच्या चालकाच्या नावाने केला. याशिवाय त्याच्याच नावाने सर्व पत्रव्यवहार केला आणि फायनान्स कंपनीची नोंदणी केली. पडद्याआड राहून तो हे सारे करत होता आणि ठेवीदारांसह एजंटांच्या समोर त्याने नियुक्त केलेले कर्मचारी येत होते.
नगरमधील घोटाळ्यानंतर संदीप पसार झाला!
सह्याद्री मल्टीस्टेट पतसंस्थेच्या माध्यमातून नगर शहरासह ग्रामीण भागात आकर्षक व्याजदर आणि परताव्याचे अमिष दाखवत संदीप थोरात व त्याच्या टोळीने ठेवी जमा केल्या. जमा केलेल्या या ठेवींच्या माध्यमातून त्याने खासगी व्यवहार केले. जमिनी खरेदी केल्या. मुदत संपत आलेल्या ठेवीदारांनी ठेवी मागण्यास प्रारंभ करताच त्या देण्यास टाळाटाळ केली जाऊ लागली. यानंतर ठेवीदारांना शंका आल्या. बहुतांश शाखांमध्ये ठेवी मिळणे अवघड होताच संदीप थोरात याने त्या संस्थांना टाळे ठोकले. कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडले. यानंतर थोरात याच्यावर गुन्हे दाखल झाले आणि तो पसार झाला.
अवैध धंद्याला संरक्षण मिळावे म्हणून वर्तमानपत्र सुरू केले!
मिडीयाच्या माध्यमातून व्यवसायात उतरण्याचे धाडस संदीप थोरात याने केले. त्यासाठी त्याने विदर्भातून प्रकाशित होणारे एक दैनिक विकत घेतल्याचे भासवले. मोठा गाजावाजा त्यासाठी केला गेला. सावेडी उपनगरातील मनमाड रस्त्यावर कार्यालय भाड्याने घेतले. त्यातून कारभारही चालू केला. पत्रकारांना मोठ्या पॅकेजसह वेतनाचे अमिष दाखवले गेले. काही त्यास बळी पडले. काही महिन्यानंतर हे दुकान बंद पडले. मात्र, या कालावधीत सह्याद्री पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक ठेवीदार आकषत केले गेले. पुढे जाऊन हे दैनिक आणि पतसंस्था दोन्हीही बंद पडले. यानंतर या दोन्हीमधील कर्मचाऱ्यांना अनेक महिन्यांच्या वेतनावर पाणी सोडावे लागले.