जामखेड। नगर सहयाद्री
जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरातील प्रमुख पीक असलेल्या ज्वारी रानडुकरं व हवामानबदलामुळे संकटात आली आहे. अवकाळी पावसामुळे खरिपातील पिकांना जीवदान मिळाले. कमी थंडीमुळे आता निसर्गाच्या अवकृपे चा फटका रब्बीतील ज्वारी लाही बसत आहे. ज्वारी वर मावा, चिकटा, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ज्वारीचे चिपाड काळे पडून खराब होऊ नये याची भीती शेतकर्यांना वाटते.
खर्डा परिसरासह दरडवाडी, गितेवाडी, मुंगेवाडी, गवळवाडी, मोहरी, सातेफळ, धनेगाव ,तेलंगशी, धामणगाव, जायभायवाडी, दिघोळ,जातेगाव हा परिसर ज्वारीचे आगार म्हणून ओळखला जातो. मागील दोन वर्षात या भागात दुष्काळजन्य परिस्थिती होती. पावसाळ्याच्या शेवटी टप्प्यात अवकाळी पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले. त्यामुळे ज्वारीची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली. ज्वारीचे पीक अगदी जोमात आहे.
मात्र सध्या सतत ढगाळ हवामानाचा ज्वारी वर परिणाम होताना दिसत आहे. ढगाळ हवामानामुळे पिकांवर किडी,मावा,चिकटा, अळ्यां यांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. ज्वारीची पाने लालसर पडली तर चिकटा व माव्यामुळे काळवंडल्यास ज्वारीचे उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच पहाटे रिमझिम पाऊस, सुटत असलेल्या वार्यामुळे ज्वारीची पिकाचे उभे ताट मोडून नुकसान होऊ शकते. त्यातच खर्डा परिसरात रानडुकरांनी धुमाकूळ घातल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे, रब्बी हंगामात शेतकर्यांना मोठ्या कष्टाने जागवलेली पिके रानडुक्करे उद्ध्वस्त करत आहे.
रानडुक्कर व जंगली प्राण्यांमुळे खेमदरा, कालदरा, लांडकदरा, इनामवस्ती, धनगर खोरी, रेशी, गोपाळवाडा, रायबाग, गोलेकर लवण सह परिसरातील शेतकर्यांच्या ज्वारीचे मोठ्या प्रमाणात रानडुकरामुळे नुकसान झाले असून वन विभागाने या रानडुकरांचा बंदोबस्त करावा, नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई, विमा मंजूर करावा अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे.