श्रीगोंदा | नगर सह्याद्री
तालुक्यातील वडाची वाडी येथे कोर्टातील दाव्याच्या कारणावरून एका महिलेस पिस्तुलाचा धाक दाखवत शिवीगाळ व मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सुरेखा मच्छिद्र झेंडे (वय 45) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गेल्या 06 जुलै रोजी दुपारी तीन वाजता त्यांच्या राहत्या घरासमोर वरील घटना घडली.
आरोपी गणेश भीवसेन झेंडे, महेश झेंडे, योगेश झेंडे (सर्व रा. चिखली), कृष्णा (पूर्ण नाव माहीत नाही), तसेच एक अनोळखी व्यक्ती असे पाच जण मिळून पिस्तुल घेऊन त्यांच्या घरासमोर आले. यापैकी आरोपी गणेश झेंडे याने पिस्तुल फिर्यादीच्या डोक्याला लावून तुला ठार करतो अशी धमकी दिली. पिस्तुलाचे बटन दाबण्यात आले, मात्र गोळी निघाली नाही.
यानंतर आरोपींनी तो मच्छा कुठे आहे ते दाखव, त्याचा गेमच करायचाय असे म्हणत हाताने मारहाण केली व शिवीगाळही केली. मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंगबाबत आक्षेप घेऊन तो हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी फिर्यादीच्या गळ्यातील अंदाजे 3 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण (किंमत सुमारे एक लाख रुपये) चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.